२३ जानेवारी रोजी दिव्यांग बांधवांसाठी विनामूल्य जयपूर फूट शिबीर
◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांचे दिव्यांग बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाजकल्याण विभाग, रत्ना निधी ट्रस्ट मुंबई व रोटरी क्लब ऑफ खडकी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी २०२५ रोजी विनामूल्य जयपूर फूट वाटपासाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
गुडघ्याखालील व गुडघ्यावरील पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेऊन त्यांना जयपूर फूट प्रदान केले जातील. मुंबई व पुणे येथील तज्ज्ञ तंत्रज्ञ या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.
शिबीर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर येथे होईल. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.