दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो - डॉ. सुजय विखे

संगमनेर Live
0
दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो - डॉ. सुजय विखे पाटील 

◻️ अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार 

◻️ खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली सडकून टिका 

◻️ बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले ;  डॉ. विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य 

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील", असा विश्वास अकोळनेर येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलता माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे." असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले.   

साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचा निर्धार..

डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल असे स्पष्ट केले.

तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. तसेच जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनेत स्थान नसल्याचे स्पष्ट केले.

यासोबतच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विळदघाटात एमआयडीसी उभारून रोजगार निर्मितीचे आश्वासन देखील दिले. तसेच विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना त्यांनी म्हटलं की, लग्नात बुंदी वाटणे किंवा इतर किरकोळ कामं करणे हे लोकप्रतिनिधींचे काम नाही. 

लोकप्रतिनिधींचे मूळ काम म्हणजे रोजगार निर्माण करणे, महिलांना सुरक्षित ठेवणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे हे आहे. असे सांगताना “मी ॲक्टिंग करणारा नेता नाही, मी माझ्या माझ्या कामातून बोलतो", असे स्पष्ट करून जनतेने विकास कामांच्या पाठीशी उभे रहावे. असे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !