नाशिक - अकोले - पुणे रेल्वे मार्गासाठी माकपच्या वतीने जन आंदोलन
◻️ कॉ. एकनाथ मेंगाळ यांची तालुका सचिवपदी पुनर्नियुक्ती
संगमनेर LIVE | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अकोले तालुक्याचे तालुका अधिवेशन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कॉ. एकनाथ मेंगाळ यांनी मागील तीन वर्षाचा अहवाल पक्ष सभासदांच्या समोर ठेवला.
देशात व राज्यात भांडवलदार व कॉर्पोरेट धार्जिण्या, धर्माध व मनुवादी शक्तीचे सरकार सातत्याने जनता विरोधी धोरणे घेत आहेत. जनता विरोधी व कॉर्पोरेट धार्जिण्या आर्थिक धोरणांमुळे देशवासियांचे जगणे अधिकाधिक कष्ट प्रत व असहनिय होत आहे.
अशा पार्श्वभूमीवर या सर्व धोरणांच्या विरोधात असणारी खदखद रस्त्यावर उतरू नये व त्याचे मतदानात रूपांतर होऊन सत्ताधाऱ्यांना सत्ता गमवावी लागू नये यासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या मित्रपक्ष व संघटनांच्या माध्यमातून श्रमिक एकजूटीमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने धर्म व जातीचा अत्यंत वाईटरित्या गैरवापर करत आहे. हिंदू - मुस्लिम, भारत-पाकिस्तान यासारख्या मुद्द्यांचा वापर करून माणसा माणसांमध्ये आणि श्रमिकांमध्ये द्वेषाचे राजकारण पसरवले जात आहे.
देशात व राज्यात अस्मितांचा व जातीचा वापर करून जातीजातींमध्ये संघर्ष लावत श्रमिकांची एकजूट नष्ट केली जात आहे. तालुक्यात सुद्धा धर्मांध शक्ती व जातीयवादी प्रवृत्ती श्रमिकांमध्ये एकजूट होणार नाही यासाठी सक्रिय आहे. तालुक्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैसा, दारू व धर्म-जातींमधील द्वेषपूर्ण विचारांचा वापर करून सत्ता हस्तगत केली गेली. या राजकारणाचा श्रमिकांवर अत्यंत विपरीत परिणाम होत असून या विरोधामध्ये करावयाच्या कार्याची रणनीती अधिवेशनामध्ये चर्चेअंती निश्चित करण्यात आली.
अकोले तालुक्याला रेल्वेद्वारे प्रमुख शहरांना जोडल्यास येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल या उद्देशाने नाशिक - अकोले - पुणे व शिर्डी - अकोले - शहापूर या रेल्वे मार्गांसाठी माकपच्या वतीने जन आंदोलन उभे करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आदिवासी भागात हिरडा प्रक्रिया उद्योग, बिगर आदिवासी भागात दूध प्रक्रिया उद्योग, शेतीमालाला रास्त भाव, आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार आदींच्या प्रश्नांची सोडवणूक विधवा, परीतक्ता, निराधार यांच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचे यावेळी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
अधिवेशनात १७ सदस्यांचा समावेश असलेली तालुका कार्यकारणी निवडण्यात आली. कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांची कार्यकारिणी सदस्यांनी पुढील अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत तालुका सचिव म्हणून निवड केली. कॉम्रेड ज्ञानेश्वर काकड, शिवराम लहामटे, सुनील बांडे, भीमा डोके, सुमन विरनक, मंगेश गिऱ्हे, नामदेव पिंपळे, भीमा मुठे, बाळू मधे, अर्जुन गंभीरे, पांडुरंग गिऱ्हे, गणेश ताजणे, वसंत वाघ, संगीता साळवे, हेमलता शेळके व अनिता साबळे यांचा तालुका कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आला आहे.
पक्ष व संघटनांचे काम विस्तारावे यासाठी आराधना बोराडे, जुबेदा मणियार, तुळशीराम कातोरे, लक्ष्मण घोडे, बहिरू रेंगडे, दत्तात्रय गोंदके, देवराम उघडे व दत्ता कोंडार यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य डॉ. अजित नवले व माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यावेळी उपस्थित होते. डॉ. अजित नवले यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले, सचिव मंडळ सदस्य नामदेव भांगरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. कॉ. सदाशिव साबळे यांनी अधिवेशनाचे समारोपीय भाषण करत नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.