◻️ सहकार महर्षी जयंती महोत्सव तयारीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाहणी
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त उद्या रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० वा होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन जवळील मैदानावर अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीची नुकतीच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली.
यशोधन जनसंपर्क कार्यालय जवळील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते.
यावर्षी उद्या रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व मा. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत व काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व मुजफ्फर हुसेन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे व माजी मंत्री राजेश टोपे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी यशोधन मैदानावर ६० बाय ६० फुटाचे भव्य स्टेज उभारण्यात आले असून भव्य मंडप, साउंड सिस्टिम, एलईडी व्यवस्था, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, पत्रकार कक्ष, प्रशस्त पार्किंग यांसह अद्यावत सुविधा करण्यात आले आहेत. याचबरोबर मागील सर्व जयंती महोत्सवातील निवडक फोटोंची गॅलरी आकर्षण ठरणार आहे.
दरम्यान या जयंती महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, अमृत उद्योग समूह व जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.