सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयी - सुविधा पुरवा
◻️ राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांचे निर्देश
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, सुरक्षा साधने व कामकाजासाठी सयंत्राचा पुरवठा करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी दिले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्यासह सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. वावा म्हणाले, अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. कार्यरत सफाई कामगारांना आवश्यक आरोग्य विषयक सेवासोबतच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांना विमा संरक्षण देण्याची कार्यवाही करावी. कामगाराची कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच आपल्या हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही डॉ. वावा यांनी दिल्या.
यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांबाबत माहिती दिली.