अकोले येथील पत्रकाराचे चित्रपट निर्मिती पाऊल, ‘नवरदेव' चित्रपट प्रदर्शित
◻️ शेतकरी मुलाचे विवाह तसेच सुख - दुःखावर चित्रपटातून भाष्य
◻️ आमदार किरण लहामटेची चित्रपटाला आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही
◻️ तालुक्यातील अनेक पत्रकारांनी साकारल्यात चित्रपटात भुमिका
संगमनेर LIVE (अकोले) | अकोले तालुक्यातील एका धडपडणाऱ्या तरुण पत्रकाराने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याने निर्माण केलेला ‘नवरदेव' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. शेतकरी पुत्राच्या विवाह समस्या या समाजाला भेडसावणाऱ्या समस्येवर तसेच शेतकऱ्याच्या सुख दुःखाच्या प्रश्नावर हा चित्रपट आधारित आहे.
अकोले तालुक्यातील कोतुळचे भूमीपुत्र असलेले पत्रकार निरंजन देशमुख निर्मित, दिग्दर्शित, कथा पटकथा, प्रमुख भूमिका असलेला नवरदेव चित्रपट आज येथील अगस्ति चित्र मंदिरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहाण्यासाठी आ. डॉ. किरण लहामटे त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांचेसह तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अकोलेकरांनी उपस्थिती दाखवून या सामाजिक आशयाच्या चित्रपटाचे कौतुक केले.
या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. के. स्टुडिओ, पुणेचे संचालक मच्छिन्द्र धुमाळ होते. यावेळी सिने अभिनेते रवींद्र नवले, एम. के. धुमाळ, राजन शिंदे यांना सांस्कृतिक क्षेत्रातील कला गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
निरंजन देशमुख यांनी आपल्या चित्रपट निर्मिती मधील संघर्षामय प्रवास सांगताना त्यांचेसह उपस्थित मान्यवर प्रेक्षक भावुक झाले होते.
या चित्रपटात अभिनेते रवींद्र नवले, पांडू कोळपकर, स्वप्नील कांडेकर, डॉ. रमा कुलकर्णी, सौ. ज्योती गायकर, निता आवारी, सचिन शिंदे, माधवराव तिटमे, ॲड. भाऊसाहेब नवले, रेवणनाथ देशमुख, अमोल आरोटे, मुन्ना शेख, जादुगार पी. बी. हांडे, शिक्षक जंगम, कुमारी गायत्री पांडे, स्व. संदीप रसाळ आदीसह स्थानिक कलावंतांनी भूमिका साकारली आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर आ. डॉ. किरण लहामटे यांनी शासनाकडून या चित्रपटासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकार निरंजन देशमुख यांच्या धडाडीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. सर्वांनी कुटुंबीयांसह हा चित्रपट पहावे असे आवाहन आ. डॉ. किरण लहामटे यांनी केले.
केवळ शेतकरी असलेल्या मुला - मुलींनीच हा चित्रपट पहावा असे नाही. तर, समाजातील सर्व घटकांमधून सहकुटुंब, सहपरिवार, हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे. चित्रपट भावनिक आहे. अश्लीलतेचा थोडासाही अंश या चित्रपटात नाही, म्हणूनच मला असे वाटते की हा चित्रपट केवळ अकोले, अहिल्यानगर पुरता मर्यादित नसून अखंड महाराष्ट्रात चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळेल अशा भावना प्रेक्षक दत्ता शेणकर प्रेक्षक यांनी व्यक्त केली.
चित्रपट निर्माते व मुख्य भूमिका असणारे निरंजन देशमुख हे पत्रकार असून हेमंत आवारी, रमेश खरबस, भाऊसाहेब वाकचौरे, सचिन खरात, प्रशांत देशमुख या पत्रकारानी देखील यात चित्रपटात भूमिका साकारली आहे.