अन्न पदार्थाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य - मंत्री नरहरी झिरवाळ
◻️ नेवासे येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, उत्तम दर्जाचे व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मूरकुटे, रंगनाथ पवार, डॉ. बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले, नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे हा त्यांचा अधिकार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना घडतात. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करत अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सामान्यांना निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, पाटील परिवाराने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचीद्वारे खुली करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणदानाच्या त्यांच्या या पुण्याच्या कार्यात त्यांना भविष्यकाळात आवश्यक असलेली सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही मंत्री झिरवाळ यांनी दिली.
दरम्यान यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तर, या कार्यक्रमास पदाधिकारी, विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.