विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करा - सुष्मिता विखे पाटील
◻️ पिंप्री - लौकी अजमपूर येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
संगमनेर LIVE (आश्वी) | राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील यांनी केले.
तसेच महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण संगणक तसेच डिजीटल साक्षरता या कार्यक्रमांचा या योजनेत समावेश असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरेच्या कला वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून पिंप्री - लौकी अजमपूर याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विखे बोलत होत्या.
याप्रसंगी कँम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे, प्राचार्य देविदास दाभाडे, सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हु गिते, अँड. रोहिणी निघुते, भाऊसाहेब लांवरे, अशोक गिते, भास्कर गिते, रामदास दातीर, दादाहरी गिते, सुर्यभान गिते आदि उपस्थित होते.
डॉ. सुष्मिता विखे पुढे म्हणाल्या की, १९७६-७७ पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या दृष्टीने ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा व आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे उत्पादनविषयक कार्यक्रम, आणिबाणी, प्रौढ शिक्षण, मनोरंजन, बालकांसाठी उपक्रम ही कामेही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी प्रा. कान्हु गिते म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबीर राबविली जातात. ज्या संस्थेत समाजकार्य करण्याची प्रथा आहे व ज्या संस्था ग्रामीण विभागातील विकासकार्य करण्याच्या दृष्टीने ग्रामीण विभागाजवळ आहेत, अशी महाविद्यालये या योजनेसाठी निवडली जातात. प्रत्येक महाविद्यालयातून २०० पर्यंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून १२० तास काम करावे लागते. प्रत्येक महाविद्यालयास कार्यक्रमाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असल्याची माहिती त्यांनी दिली.