क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचा अमृतवाहिनीतील विद्यार्थ्याशी स्नेहसंवाद
◻️ संगमनेरचे नाव जागतिक पातळीवर आणखी पुढे नेणार - अजिंक्य रहाणे
◻️ अजिंक्य रहाणे कडून १० हजार विद्यार्थ्यानासमवेत सेल्फी
संगमनेर LIVE | मागील काही वर्षामध्ये संगमनेर तालुका हा राज्यात प्रगतशील आणि गौरवशाली तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका वैभवशाली बनवण्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवामुळे विद्यार्थ्याना मोठे व्यासपीठ मिळाले असून संगमनेरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी पुढे नेण्यासाठी आपण काम करू. असे प्रतिपादन स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी केले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत मेधा महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्याशी झालेल्या स्नेहसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बी. एम लोंढे, डॉ. आर एस वाघ, विलास भाटे, श्रीमती शीतल गायकवाड, सौ. जे. बी. सेठी, अंजली कन्नावार, प्रा. जी. बी. काळे, डॉ. विलास शिंदे, नामदेव गायकवाड आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाले की, सौ. शहरी एक संगमनेरी असे आपण आहोत. या माती बद्दल मला कायम अभिमान आहे. माझ्यामध्ये अद्यापही बरेच क्रिकेट शिल्लक असून संगमनेरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगताना आपल्या देशामध्ये आई - वडिलांचे मोठे श्रेय असल्याचे त्यांनी म्हटले
तर युवकांनी जीवन जगताना दृष्टिकोन चांगला ठेवावा. खेळात आणि दैनंदिन जीवनात समोरच्याच्या बद्दलही तुम्ही आदर केला पाहिजे. तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला मोठे करण्यामध्ये ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्यांना कधीही विसरू नका असे सांगताना सौ. शरयूताई देशमुख व राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतील अमृतवाहिनी मेधा महोत्सवामुळे तरुणांना कला व क्रीडा गुणांना मोठे व्यासपीठ मिळाले असल्याचे ते म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राजकारणामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अजिंक्य रहाणे यांनी संगमनेरचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. अजिंक्य या मातीतील आहे. आपल्या सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. संगमनेर आणि अजिंक्य रहाणे यांचे घट्ट नाते असून यापुढेही ते कायम राहील असे सांगताना अजिंक्यने अजून खूप दिवस क्रिकेट खेळून देशाची सेवा करावी त्याचप्रमाणे युवकांनी अजिंक्य कडून आदर्श घेत आपल्या क्षेत्रातील अजिंक्य रहाणे व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी आभार मानले.
तो आला आणि त्याने जिंकले..
मेधा महोत्सवातील पतंग उत्सवानंतर स्नेहसंवादासाठी अजिंक्य रहाणे यांचे अमृतवाहिनीत आगमन होताच सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे स्वागत केले. १० हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि उत्साह पाहून अजिंक्य रहाणे भारावून गेला. सर्वांना त्यांनी उत्स्फूर्त दात देत स्वागत स्वीकारले. याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांसमवेत अजिंक्यने एक सेल्फी घेतला.