संगमनेर तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राज्यकर्ते व प्रशासनाला इशारा
◻️आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा घाट घातल्याचा केला आरोप
संगमनेर LIVE | संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी संगमनेरचा विकास व एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा असून संगमनेर तालुक्याची मोडतोड कदापिही सहन करणार नाही. असा गर्भित इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यकर्ते व प्रशासनाला दिला.
याबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब. २०२२ / प्रक्र. ९४ / म - १०, दिनांक १७ जानेवारी २०२३ यानी राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही संगमनेर शहर हे मध्यवर्ती असल्याने सर्वांच्या सोयीचे आहे. याचबरोबर शहरात मध्यवर्ती असे भव्य तहसील व प्रांताधिकारी कार्यालय आहे. मात्र नव्याने प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा डाव आखला जात आहे तो कदापिही सहन करणार नसल्याचे म्हटले.
संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावे देखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून - बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जन आंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी म्हटले.
नव्याने प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयात आश्वी बुद्रुक महसूल मंडळातील आश्वी, प्रतापपूर, उंबरी बाळापुर, औरंगपूर, सादरपूर, चिंचपूर बुद्रुक व खुर्द, निमगावजाळी, रहिमपूर, ओझर खुर्द, मनोली या गावांचा समावेश आहे.
शिबलापुर महसूल मंडळात पानोडी, आश्वी खुर्द, खळी, पिंप्रीं - लौकी अजमपुर, चनेगाव, झरेकाठी, दाढ खुर्द, मालूंजे, डिग्रस, शेडगाव, हंगेवाडी या गावाचा समावेश आहे.
पिंपरणे महसूल मंडळात जाखुरी, अंभोरे, कोळवाडे, ओझर बुद्रुक, कनोली, कनकापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, निंबाळे, वाघापूर, खराडी, रायते या गावांचा समावेश आहे.
संगमनेर शहरानजीक असलेल्या संगमनेर खुर्द या महसूल मंडळात संगमनेर खुर्द, खांडगाव, वैदुवाडी, चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, रायतेवाडी, देवगाव, निमगाव टेंभी, शिरापूर, निमज, सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, हिवरगाव पावसा या गावांचा समावेश आहे.
समनापुर महसूल मंडळात कोकणगाव, कोंची, मांची, शिवापूर, पोखरी हवेली, कुरण, वडगावपान, माळेगाव हवेली, सुकेवाडी, खांजापुर या गावांचा समावेश आहे.
दरम्यान संगमनेर खुर्द व समनापुर हे महसूल मंडळ संगमनेर शहराच्या अत्यंत जवळ आहे. याशिवाय पिंपळगाव माथा, सावरगाव तळ हे पश्चिमेतील गावे ही आश्वीला जोडली आहेत. तसेच सुकेवाडी, खाजापुर, वडगावपान ही गावे देखील आश्वीला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा कोणता न्याय आहे असा प्रश्न कॉग्रेस कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे.