अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४ मध्ये विविध विषयावर परिसंवाद
संगमनेर LIVE | शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज येथे दोन दिवसीय अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात होते. यानिमित्ताने ग्रंथोत्सवामध्ये विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी ‘अभिजात मराठी भाषा एक साहित्यिक प्रवास’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी भूषविले. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावीत, पत्रकार भूषण देशमुख परिसंवादात सहभागी झाले होते. मराठी भाषेच्या विविध पैलूंवर या परिसंवादामध्ये चर्चा करण्यात आली. डॉ. गावीत यांनी मराठी भाषेच्या विकासाचे टप्पे यावेळी मांडले.
‘वाचन संस्कृती आणि प्रसारमाध्यमे’या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे होते. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार, डॉ. संजय कळमकर, जेष्ठ साहित्यिक, शाखा पाथर्डीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजकुमार घुले यांनी परिसंवादात सहभाग घेतला. वाचन संस्कृती आणि प्रसार माध्यमांचे परस्पर पूरक असून नव्या पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
२७ जानेवारी रोजी निमंत्रित कवींचे ‘कविसंमेलन’संपन्न झाले. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या संमेलनामध्ये साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांची उपस्थिती होती.
‘ग्रंथालये लोकशिक्षणाची संस्कार केंद्रे’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांनी भूषविले. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, साहित्यिक डॉ. बापू चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, पत्रकार बंडू पवार, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजच्या ग्रंथपाल संगिता निमसे उपस्थित होते.
‘भारतीय ग्रंथालय चळवळीतील आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड’ या विषयावर जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सखोल विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक स्वप्निल तनपुरे, संजय बोरूडे, सुनिल गोसावी, पत्रकार अनंत पाटील, न्यु आर्टस कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ हे उपस्थित होते.
डॉ. विष्णू सुरासे यांनी ‘हास्यतरंग’ हा विनोदी कवितांवर अधारित रंगतदार कार्यक्रमातून उपस्थित रसिकांना खळखळून हसवले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, ज्येष्ठ साहित्यिक जयंत येलुलकर, जेष्ठ पत्रकार राजेंद्र झोंड, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे उपस्थित होते.
यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आयोजित जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच ग्रंथोत्सवाच्या आयोजनासाठी योगदान देणारे ग्रंथालय कार्यकर्ते, सेवक, ग्रंथ विक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.