प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा - अपर जिल्हाधिकारी कोळेकर
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मराठी भाषेचे सौंदर्य व लवचिकता' या विषयावर परिसंवाद
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | भाषा हे जरी ज्ञान मिळविण्याचे माध्यम असले तरी त्या पुढेही जाऊन आपल्या मातृभाषेचा विकास आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषा अधिक सोईस्कर असून व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर आणि तिचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी बाळसाहेब कोळेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त 'मराठी भाषेचे सौंदर्य व लवचिकता' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कोळेकर बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य डॉ. संजय कळमकर, डॉ. कैलास दौंड, किशोर मरकड, प्रा. शशिकांत शिंदे, तहसिलदार शरद घोरपडे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिवगुंडे आदी उपस्थित होते.
कोळेकर म्हणाले, मराठी भाषा ही भारतातील एक प्राचीन आणि समृद्ध भाषा असून, तिच्या सौंदर्य आणि लवचिकतेमुळे ती आजही लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वैविध्यपूर्ण बोली, साहित्यिक परंपरा, आणि तांत्रिक शब्दसंपदेमुळे मराठी भाषा कालसुसंगत राहिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने प्रत्येकामध्ये एक नवी उर्जा निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. कैलास दौंड म्हणाले, मराठी भाषेची साहित्यिक परंपरा संतांच्या अभंगांपासून आधुनिक साहित्यापर्यंत विस्तारलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या संतांनी समाजाला मार्गदर्शन करणारे विचार देताना मराठीला एक आध्यात्मिक ओळख दिली. तर अनेक लेखकांनी आधुनिक मराठी साहित्याला नवीन आयाम दिले. मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. मराठी चित्रपट, नाटक, लोककला आणि सण - उत्सवांमुळे मराठी भाषेची गोडी लोकांपर्यंत पोहोचत असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. संजय कळमकर म्हणाले, मराठी भाषा जितकी सुंदर आहे तितकीच ती लवचिकही आहे. शब्दांमधूनच मराठी भाषेचे सौंदर्य अधिक खुलत जाते. इंग्रजी भाषेकडे जरी जागतिकीकरणाची भाषा म्हणून पाहिले जात असले तरी मानवाचा विकास केवळ मातृभाषेमुळेच होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईची भाषा म्हणून मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. दौंड यांनी लिहिलेल्या ‘खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कोरोनाच्या काळात आलेल्या अनुभवावर पुस्तकाचे लिखाण केल्याबद्दल पत्रकार बंडू पवार यांचा सन्मानही करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही या ठिकाणी उभारण्यात आले होते.