प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण!
◻️ पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार आहे.
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० पूर्वी किंवा सकाळी १० वाजेनंतर करावा. अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधुन शिऊन बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.