◻️ स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; आरोपीकडून ५ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त
संगमनेर LIVE (अहिल्या नगर) | रूपेश मुरलीधर भालेराव (वय ४८, रा. मालपाणीनगर, सुदर्शन बंगला, संगमनेर) यांनी दि. ०६/१२/२०२४ रोजी रात्री अज्ञात आरोपीनी त्यांचे बंगल्याचे टेरेसवरील दरवाजाचा कडीकोंडा तोडून बंगल्यामध्ये प्रवेश करून ३ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०१३/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
त्यामुळे पोलीस अधिक्षक यांच्या सुचनानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
या पथकाने गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवुन, घटनाठिकाणच्या आसपासचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा विकास सरदारसिंग मिना याने त्याचे साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न केले. पथकाने मध्यप्रदेश राज्य येथे आरोपीचे राहते पत्त्यावर शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना असे सांगीतले. आरोपीकडे गुन्हयाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा २) आदित्य कंजर (रा. रूलकी, ता. जि. शाजापूर, राज्य मध्यप्रदेश) (फरार) याचेसह केल्याचे सांगीतले.
यावेळी आरोपीकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हयातील चोरी केलेले काही दागीने हे त्याचा मित्र निरज मनोज छावडी यास स्वत:चे पत्नीसे दागीने असल्याचे सांगुन दिले व उर्वरीत दागीने हे आदित्य कंजर याचेकडे असल्याचे सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीवरून निरज मनोज छावडी याचे राहते घरी जाऊन पथकाने खात्री केला असता तो बाहेरगावी असल्याने, त्याचे घरी गुन्हयांतील दागीने हजर करणेबाबत माहिती दिली.
दि. १८/०१/२०२५ रोजी पंचासमक्ष निरज मनोज छावडी (वय ३०, रा. रूलकी, ता. जि. शाजापूर, राज्य मध्यप्रदेश) याने माहिती दिली की, विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना हा माझा मित्र असून त्याने डिसेंबर २०२४ मध्ये त्याचे पत्नीचे दागीने असल्याचे सांगुन १० - १५ दिवस ठेवण्यासाठी दिले असल्याची माहिती दिली. तसेच तपासात पंचासमक्ष त्याचेकडून ५ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने त्यात गंठण, नेकलेस, चैन व कर्णफुले असे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत.
तर आरोपी विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना याला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.