डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था मजबूत - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना अभिवादन
संगमनेर LIVE | गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून यूपीए सरकारच्या कार्यकाळात अन्नसुरक्षा कायदा, आरोग्याच्या विविध योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार असे अनेक कल्याणकारी धोरण राबविणारे जागतिक कीर्तीचे अर्थतजज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी खुली अर्थव्यवस्था स्वीकारून भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया घातला असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेर येथे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड, रणजीत सिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. हिरालाल पगडाल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे असून त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलले. १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. लायसन राज संपवून उद्योग व्यवसाय वाढीला चालना दिली. यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसह अनेक जागतिक पातळीवरील कंपन्यानी भारतात गुंतवणूक केली.
त्यातून रोजगार मोठ्या प्रमाणात वाढला. आज अनेक भारतीय विविध देशांमध्ये कार्यरत आहेत हे त्याचे फलित आहे. २००४ मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारताना त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महाराष्ट्राचा रोजगार हमीचा कायदा देशपातळीवर राबवला. याचबरोबर माहिती, शिक्षणाचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा, महिला व बालकांसाठी आरोग्याच्या विविध सुविधा त्यांनी निर्माण करून दिल्या. श्रीमती सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी यूपीएच्या काळामध्ये घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय यांची जागतिक पातळीवर कौतुक झाले.
२००८ मध्ये ७० हजार कोटींची कर्जमाफी त्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री व मी कृषी मंत्री होतो. शेतकऱ्यांशी अत्यंत तळमळीने संवाद साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा साधेपणा, स्वच्छ चरित्र, निगर्वीपणा हा देशवासीयांच्या कायम स्मरणात राहणारा असल्याचे ते म्हणाले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, अत्यंत बुद्धिमान असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी २००८ मध्ये देशाला जागतिक मंदीतून बाहेर काढले. ते कमी बोलत होते. परंतु कामातून त्यांचे बोलणे देशासाठी हिताचे होते. अनुकराराच्या वेळी ते ठाम राहिले. राजकीय हेतूने विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले परंतु अद्याप एकही आरोप सिद्ध झाला नाही. असे स्वच्छ चारित्र्य असलेल्या मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ हा देशाच्या प्रगती महत्त्वपूर्ण राहिला असल्याचे ते म्हणाले.