अमृतवाहिनी सहकारी बँकेमध्ये डिजिटल सेवा सुरू
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने फोन पे, क्यू आर कोड सह विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ केला असून अमृतवाहिनी बँकेने केलेले आधुनिक बदल कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या सौ. मथुराबाई थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन सुधाकर जोशी होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. नारायणराव कार्ले, बँकेचे उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे, ॲड. आर. बी सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी बँकेने सभासद शेतकरी यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. काळानुसार आधुनिक बदल केले आहे. डिजिटल सेवा ही अत्यंत गरजेची झाली असून लहान विक्रेत्यांकडेही ऑनलाइन पेमेंट आहे. त्यामुळे ग्राहकांना आवश्यक अशा सर्व ऑनलाईन सुविधा देण्याचे काम अमृतवाहिनी बँकेने केले आहे.
बँकिंग हा व्यवसाय अत्यंत अवघड असून रिझर्व बँकेचे अनेक निर्बंध आहेत. तरीही बँकेने अत्यंत चांगले काम केले आहे. सर्वांसाठी हक्काचे साधन म्हणून बँक असून सभासद, शेतकरी या सर्वांचा मोठा विश्वास आहे. संगमनेरचा सहकार हा सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचा असून या सहकाराने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची तत्व जपत जनतेच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
डॉ.हतांबे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी व माणसाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संगमनेरच्या सहकाराचे मॉडेल असून संगमनेर मधील बँकिंग सहकार शिक्षण हे उच्च दर्जाचे आहे. संगमनेरच्या सहकाराचा राजहंस हा ब्रँड विश्वासाचा ब्रँड ठरला आहे. बँकेमध्ये सुरू झालेल्या डिजिटल सुविधामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असल्याचे ते म्हणाले.
सुधाकर जोशी म्हणाले की, ई बँकिंग मुळे नागरिकांचा वेळ वाचतो. नवीन पिढी ही सर्रासपणे ई बँकिंग चा वापर करत असून काळाबरोबर चालण्याकरता बँकेने सर्व डिजिटल सेवा सुरू केली आहेत. जिओ प्लॅटफॉर्मवर सर्व शाखा जोडल्या असल्याने पुढील काळामध्ये सर्व नागरिकांना डिजिटल सेवांचा सर्व लाभ मिळणार आहे.
यावेळी के. के. थोरात, संचालक किसनराव सुपेकर, शिवाजी जगताप, किसन वाळके, संजय थोरात, श्रीकांत गिरी, शांताराम फड, ॲड. लक्ष्मणराव खेमनर, अण्णासाहेब शिंदे, बाबुराव गुंजाळ, श्रीमती ललिता दिघे, भाऊसाहेब गीते, कचरू फड, राजेंद्र काजळे, राजू गुंजाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले. तर, व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सभासद अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोन पे सह बँकेच्या डिजिटल सेवा..
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमृतवाहिनी बँकेने यूपीआय, फोन पे, क्यू आर कोड, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड,यांसह विविध डिजिटल सेवांचा प्रारंभ केला. सर्व शाखा ऑनलाईन केल्या असून नव्याने डेंटल कॉलेज समोर एटीएम सुविधा सुद्धा सुरू करणार असल्याचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी सांगितले.