मराठी भाषेच्या प्रसारा करीता ग्रंथ प्रदर्शना सारखे उपक्रम उपयुक्त - मंत्री विखे

संगमनेर Live
0
मराठी भाषेच्या प्रसारा करीता ग्रंथ प्रदर्शना सारखे उपक्रम उपयुक्त - मंत्री विखे 

◻️ जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा!

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी ग्रंथ प्रदर्शनासारखे उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी जिल्हावासियांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, तहसिलदार शरद घोरपडे, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व्यवहारात मायबोली मराठीचा वापर अधिकाधिक होणे आणि विविध क्षेत्रातील ज्ञान मराठी पुस्तकांच्या माध्यमातून पोहोचविले जाणे आवश्यक असल्याचे मतही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी भाषेचा व्यवहारात उपयोग करणे आणि इतर भाषांमधील शब्द मराठीत आणणे आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाला मराठी भाषा समितीचे सदस्य किशोर मरकड, पत्रकार अशोक निंबाळकर, उपजिल्हाधिकारी भारती सगरे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे, तहसिलदार शरद घोरपडे, डॉ. अमोल बागुल आदी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, व्यवहारात सुटसुटीत भाषा आणि सोप्या शब्दांचा उपयोग करणे गरजेचे आहे. विशेषत: शासकीय कार्यालयात सामान्य माणसाला कळेल अशा शब्दांचा उपयोग करावा. भाषेच्या विकासासाठी समाजमाध्यमांवरील मजकूर मराठीतून तयार करण्यास प्रोत्साहीत करण्यात यावे. एखाद्या पुस्तकावर चर्चा झाल्यास भाषेचा प्रवाह वेगवान होण्यास मदत होत असल्याने मराठीतील पुस्तकांवर चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनांसारख्या उपक्रमांचे आयोजन यासाठी उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील संशोधनला चालना देणे, शालेयस्तरावर मराठी भाषेसंदर्भातील उपक्रमांचे आयोजन, बोली भाषेचे संवर्धन व अभ्यास या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, असेही मोरे म्हणाले.

निंबाळकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाचा मिळाल्यांनंतर या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने या दिवसाला महत्व आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा उपयोग अनिवार्य करण्यात आला आहे. भाषेच्या विकासामुळे सांस्कृतिक विकासालाही चालना मिळत असते. त्यामुळे मातृभाषेचे संवर्धन आवश्यक आहे. लेखक भाषेला समृद्ध करतो, त्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील लेखन करावे. विशेषत: व्यवहारातील शब्द आणि भाषेबाबत लिखाण आवश्यक आहे. त्यासोबतच बोली भाषाही समृद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मरकड म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषा जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. मराठीचे संवर्धन करण्याची आणि तिला समृद्धीच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. महसूल संबंधी पुस्तकांचेदेखील एक ग्रंथालय असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने किमान आठ दिवसात एखादे पुस्तक वाचावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमा निमित्त डॉ. बागूल यांनी काढलेली रांगाळी विशेष चित्तवेधक आणि माहितीपूर्ण होती.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !