पालकमंत्र्याकडून राज्य परिवहन महामंडळाचा जिल्हास्तरीय आढावा
◻️ बसस्थानकात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा द्या - मंत्री विखे पाटील
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला. बसस्थानकात प्रवासी, चालक आणि वाहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, सुरक्षेच्यादृष्टीने सर्व स्थानकांना भेटी देऊन आढावा घ्यावा आणि सीसीटीव्हीद्वारे प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रादेशिक व्यवस्थापक, अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, बसस्थानकात रात्रीच्या वेळी प्रकाश राहील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा. स्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची देखभाल आणि स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करावी. बसस्थानकात प्रवाशांना तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करावा.
बस स्थानकाचे काम करतांना नावीन्यपूर्ण कल्पना अंमलात आणाव्या, प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासोबत महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या स्थानकाचे काम करतांना बीओटी तत्वावर सुधारित प्रस्ताव तयार करावा. बसस्थानक परिसरात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. चालक आणि वाहकांना विश्रांतीसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा.
जिल्हा मुख्यालय ते तालुका मुख्यालय प्रायोगिक तत्वावर विना थांबा गाड्या सोडाव्यात. ग्रामीण भागासाठी जनता गाड्या सुरू ठेवाव्यात. एसटी बसेसमध्ये स्वच्छता ठेवावी. नवीन एसटी बसेसचा प्रस्ताव सादर करावा. बस थांब्यावर दिलेल्या अटी शर्तीचे पालन होण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा ठिकाणी असलेल्या सुविधांचे फलक आणि तक्रारीसाठी क्रमांक प्रदर्शित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
दरम्यान यावेळी जिल्ह्यातील बसस्थानकांच्या नूतनीकरण कामांचा आढावा घेण्यात आला.