यशोधनमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
◻️ समृद्ध परंपरा असलेली मराठी भाषा सदैव अभिमानास्पद - बाळासाहेब थोरात
◻️ साहित्यिक व कवी यांच्या उपस्थितीत संवाद
संगमनेर LIVE | विविध बोलीभाषा असूनही अत्यंत गोडवा आणि माणसे जोडणारी मराठी भाषा आहे. ती अधिक समृद्ध करण्यासाठी साहित्यिकांनी काम करावे. आपल्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान असून हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेली मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि ही भाषा आपल्या सर्वांसाठी सदैव अभिमानास्पद असल्याचे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित साहित्यिक व कवी यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्रा मा. रा. लामखडे होते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, प्राचार्य हिरालाल पगडाल, सुरेश परदेशी, डॉ. सुधाकर पेटकर, कवी सुभाष कर्डक, अनिल देशपांडे, दीपकराव करपे, कृष्णा मेंगाळ, भारत रेघाटे, सौ. सीमा अंत्रे, सौ. जयश्री शिंदे, डॉ. नीलिमा निघुते, सौ. नीलिमा क्षत्रिय, सुनील सातपुते, सौ. अपर्णा दाने, रमेश शिंदे, डॉ. विवेक वाकचौरे, शेख, राजाभाऊ भडांगे, कवी अनिल सोमनी, प्रा. बाबा खरात, मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड आदींसह संगमनेर मधील साहित्यिक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. संत आणि विचारवंत, साहित्यिकांनी ही भाषा अधिक समृद्ध केली आहे. अनेक भाषांची आक्रमण होत आहेत मात्र तरीही मराठी दमदारपणे टिकून आहेत. काही किलोमीटरवर आपली बोलीभाषा बदलते. परंतु मराठी भाषेमधून तयार झालेली महाराष्ट्र धर्माची एकता टिकून आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. हे आपल्याला जपायची आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष तारा भवाळकर यांनी केलेले मार्गदर्शन हे अत्यंत अभ्यासपूर्ण व स्फूर्तीदायी असून ते प्रत्येकाने ऐकले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन मराठी भाषा समृद्ध करताना मानवता धर्म वाढीसाठी लेखक कवी साहित्यिक यांनी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. मा. रा. लामखडे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी बंड करून संस्कृत मधून गीता मराठीत आणली. मराठी भाषेचे संगोपन करण्यासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. मराठी भाषा जिवंत राहावी याकरता बोली भाषेतील शब्द या भाषेमध्ये आले पाहिजे. मात्र सध्या राजकीय लोक हे भाषा आणि जातीचा वापर करून भेद निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी हिरालाल पगडाल यांनी कविता काय तुमच्या बापाची ही कविता सादर केली. तर सोशल मीडियाने विशिष्ट लोकांची मक्तेदारी मोडली असल्याचे म्हटले. सुधाकर पेटकर यांनी रक्त आटवायला ढेकळात आता राम नाही ही शेतकऱ्याची कविता सादर केली.
डॉ. नीलिमा निघुते यांनी आई वरील पौर्णिमेचा चंद्र ही कविता सादर केली. अनिल देशपांडे यांनी माणसाच्या वाकड्या वृत्तीवर टीका केली. प्रा. बाबा खरात यांनी समाजात माणसांच्या होणाऱ्या हेटाळणीवर कविता सादर केली.
याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना सहकारतीर्थ हा पुरस्कार मिळाल्याबद्ल सर्व साहितीकांच्या वतीने प्रा. मा. रा. लामखडे यांनी त्यांचा सत्कार केला.
साधी भोळी मराठी भाषा महाराष्ट्र धर्म वाढवणारी - डॉ. जयाताई थोरात
मराठी भाषा ही साधी भोळी आणि सर्वांना जोडणारी आहे. १८ पगड समाजातील नागरिकांना मराठीने एकत्र जोडून ठेवले. संत आणि विचारांची मोठी परंपरा असलेल्या या भाषेने महाराष्ट्र धर्म वाढवला असल्याचेही त्या म्हणाल्या.
तर पुरोगामी विचार व मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख राहिली आहे. अनेक संस्कृती व विचारांची आक्रमणे झाली तरी मराठी भाषा ही टिकून समृद्धपणे उभी राहिली आहे असे गौरवउद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
काळजात बाळासाहेब थोरात कवितेला उदंड प्रतिसाद..
कविवर्य वामनदादा कर्डक यांचे नातू इंजिनियर सुभाष कर्डक यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी आमच्या काळजात बाळासाहेब थोरात ही कविता सादर केली. या कवितेने उपस्थित सर्वांना अभिमान वाटला तर कविता ऐकताना प्रत्येकाला गहिवरूनही आले.