मोफत उपचारासाठी शासनाच्या खासगी दवाखाने शासनाशी संलग्नित करा
◻️ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सुचना
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक खासगी दवाखान्यातून रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने दोन्ही योजनांशी संलग्नित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालये संलग्नित करण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अभिलाषा खरसडे, डॉ. अनिकेत भालसिंग, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे, विठ्ठल वांढेकर, हर्षल साळवे, शरद कोंडा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, समाजातील प्रत्येक गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तर राज्य शासन महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना राबवित आहे. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खासगी दवाखान्यांनी योजनेच्या संलग्निकरणासाठी पुढाकार घ्यावा. खासगी दवाखान्यांना यामध्ये काही अडचणी येत असतील अडचणींच्या सोडवण्यासाठी राज्यस्तरावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
मुला - मुलींच्या लिंग गुणोत्तरातील दरी कमी व्हावी यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणी करावी. सामाजिक दृष्टिकोन ठेऊन मुलींचा जन्मदर वृद्धिंगत करण्यासाठी खासगी दवाखान्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे. जिल्ह्यात गुलियन बॅरे सिंड्रोम आजाराचा संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले.
दरम्यान या बैठकीस जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.