१९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगरमध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | संस्कृतीचे जतन, संवर्धन होऊन समाज प्रबोधनासाठी जिल्ह्यात १९ ते २१ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान सायंकाळी ७ वाजता माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे शाहिरी व संगीतावर आधारित शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा विभागाचे अपर मुख्य सचिव
विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या प्रथम पुष्पात दि. १९ फेब्रुवारी रोजी शाहीर शिवाजी शिंदे, अहिल्यानगर यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर शाहीर विजय पांडे, अकोला व शाहीर तुकाराम ठोंबरे, बीड यांचे सादरीकरण होईल.
महोत्सवाच्या द्वितीय पुष्पात दिनांक २० फेब्रुवारी रोजी युवा शाहीर गणेश ताम्हणे, रायगड, शाहीर अनिता खरात, सांगली व शिवशाहिर विजय तनपुरे, अहिल्यानगर यांचे सादरीकरण होईल. तर या महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पात २१ फेब्रुवारी, २०२५ रोजी युवाशाहीर शुभम अवधूत विभुते, सांगली, शाहीर शिला लोंढे, कोल्हापूर तसेच मोहन गणपती यादव, सांगली यांचे यांचे सादरीकरण होईल.
दरम्यान महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.