ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
◻️ निवडणूक आयोगाला न्यायालयाने पाठवली नोटीस
◻️ सायंकाळी ६ नंतर मतदान कसे वाढले ?
संगमनेर LIVE (मुंबई) | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात खुलासा सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ॲड. आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले होते.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, "निवडणुकीचा निकाल देताना, पोल व्होटस् अन् काऊंटर व्होटस् यांची जुळवणी झाली पाहिजे. ती झाली नसेल, तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्ताऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील, त्यानुसार निकाल पाहिजे". निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही, असाही आक्षेप ॲड. आंबेडकर यांनी घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसं वाढलं, यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला असून, केवळ प्रश्न उपस्थित करून आम्ही हा मुद्दा सोडून दिलेला नाही. तर आमचा पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयीन पातळीवर आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत खुलासा करण्याची विनंती केली आहे, असे याचिका दाखल केली होती तेंव्हा आंबेडकर यांनी याआधी सांगितले होते.
दरम्यान त्याच प्रकरणात आता हायकोर्टाने दखल घेऊन निवडणूक आयोगाला नोटीस बजावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याचे हे मोठे यश मानले जात आहे.