अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव!

संगमनेर Live
0
अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव!

◻️ संसदीय कार्यपद्धती संशोधनात विशेष कामगिरी

◻️ देशभरातील ३५ युवकांमध्ये महाराष्ट्राचे एकमेव प्रतिनिधी म्हणून सहभागी 

संगमनेर LIVE (नवी दिल्ली) | अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संसदीय कार्यपद्धती आणि धोरणात्मक बाबींच्या सखोल अध्ययनासाठी राज्यसभा सचिवालयातर्फे हा उपक्रम राबवला जातो.

संसदीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव..

गणेश ढवण यांनी तीन आठवड्यांच्या या इंटर्नशिपदरम्यान संसदीय प्रक्रिया, संसदीय चर्चा, विविध समित्यांची कार्यशैली आणि धोरण निर्मिती प्रक्रिया यांचे सखोल प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमात संसद सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, खासदार आणि विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. देशभरातून ३५ युवकांची या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती, त्यामध्ये महाराष्ट्राचे एकमेव प्रतिनिधी म्हणून गणेश ढवण हे होते.

“राज्यसभा सचिवालय संशोधन इंटर्नशिप पूर्ण करणे हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अनुभव ठरला. संसदीय कामकाज आणि प्रक्रिया जवळून समजून घेता आली. सार्वजनिक सेवा आणि धोरणनिर्मितीबाबत सविस्तर अभ्यास करण्याची संधी मिळाली. संसद सदस्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर उपराष्ट्रपतींकडून प्रमाणपत्र मिळणे, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. या संपूर्ण प्रवासात खासदार डॉ. फौझिया खान यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे ढवण यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !