डॉ. विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५” चा राष्ट्रीय पुरस्कार
◻️ ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ म्हणुन डॉ. श्याम गणवीर यांचा गौरव
संगमनेर LIVE | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५” चा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
फिजीओथेरेपी अर्थात भौतिकोपचार तज्ज्ञ यांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असलेल्या इंडियन असोशिएशन ऑफ फिजीओथेरेपी (आयएपी) तर्फे दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथे दोन दिवसीय फिजीओथेरेपीस्ट्स तज्ज्ञांच्या ६२ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५" पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तसेच ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ म्हणुन डॉ. श्याम गणवीर यांना सन्मानीत करण्यात आले.
हे पुरस्कार आयएपीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अली इराणी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. संजीव झा, खजिनदार डॉ. रूची वाष्णेय, आमदार सत्यजीत तांबे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे प्रा. डॉ. अभिजीत दिवटे, संचालक (वैद्यकीय) व प्रा. डॉ. श्याम गणवीर, प्राचार्य यांनी स्वीकारला.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे भौतिकोपचार महाविद्यालय हे सन २००७ पासुन सुरू असुन राष्ट्रीय मुल्यांकन एवं प्रत्यापन परिषद (NAAC) व्दारे 'A Grade' मानांकित आहे तसेच तज्ज्ञ शिक्षकवृंद यांचेमार्फत प्रतिभावान, कार्यक्षम आणि अष्टपैलु भौतिकोपचारतज्ज्ञ घडविण्याचे अविरत कार्य करित आहे. या महाविद्यालयामध्ये ६० क्षमतेने पदवी (UG) व ०५ विषयांत पदव्युत्तर (PG) तसेच २४ विद्यार्थी विद्यावाचस्पती (Ph.D.) अभ्यासक्रम पुर्ण करित आहेत.
भारतात भौतिकोपचार तज्ज्ञांची संख्या खुप कमी आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढविणे गरजेचे असुन अनेक व्याधींमुळे रूग्णांना हालचाल करणे व खेळाडूंसाठी सुध्दा फिजीओथेरेपीचे योगदान महत्वपुर्ण ठरत आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले.
१९५५ साली स्थापन झालेल्या इंडियन असोशिएशन ऑफ फिजीओथेरेपी या संस्थेच्या सदस्यांनी समाजाला व देशाला सशक्त व सुदृढ ठेवण्यासाठी केलेल कार्य गौरवास्पद असल्याचे ही नमुद करण्यात आले.
दरम्यान डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय विखे पाटील तसेच महासंचालक (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड यांनी भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.