चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करा
◻️ अन्यथा आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा - सरपंच भाऊराव राहणे
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजना करता सुमारे ८०० कोटी रुपये निधी मंजूर करून काम सुरू केले. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतू ठेवून अनेक कामे बंद पडली आहेत.
त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असून चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा ही जलजीवन योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे बंद असलेले काम तातडीने सुरू करावे. अशी मागणी सरपंच भाऊराव राहणे यांनी केली असून तातडीने काम न सुरू झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
याबाबत चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, यांनी ज्येष्ठ नेते आर. बी. राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. यावेळी समवेत उपसरपंच हौसाबाई कढने, सौ. लक्ष्मी राहणे, सौ. मंगल वाकचौरे, सौ. सुरेखा काळे, शंकरराव रहाणे, सीमाताई भालेराव, गोरख सातपुते, किरण राहणे, राजेंद्र भालेराव, सौ. विद्याताई राहणे, रंगनाथ खरडे, हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, झोळे चे माधव वाळे, दत्तू गोफने आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांनाही निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांच्यासाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या अंतर्गत चंद्नापुरी, झोळे व हिवरगाव पावसा ही तीन गावे आदर्श ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमधून जोडली जाणार आहेत. काही लोकांनी राजकीय हेतू ठेवून ही कामे बंद ठेवली आहे. याचबरोबर झोळे येथील साठवण तलावाचे काम जवळजवळ वीस दिवसांपासून बंद आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करू नये प्रशासनाने कुठलीही ठोस पावले उचललेली नाही.
प्रशासनाकडून होणाऱ्या या हलगर्जीपणा बाबत नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारला आहे. मात्र तरीही राजकीय उद्देश ठेवून हे काम बंद पाडले आहे. म्हणून शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हे काम सुरू न केल्यास आत्मदहन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील असा इशारा चंदनापुरी झोळे व हिवरगाव पावसा आदर्श ग्राम पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा चंदनापुरीचे सरपंच भाऊराव रहाणे यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत रहाणे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांनाही निवेदन दिले आहे. तर शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, त्याचप्रमाणे उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, यांना ही निवेदन दिले आहे.