विळद घाटात सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन कोर्स प्रशिक्षण सुरू
◻️ डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शुभारंभ
संगमनेर LIVE (अहील्यानगर) | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुरस्कृत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन या कोर्सच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, विळदघाट एमआयडीसी, अहिल्यानगर येथे सुरू झाले आहे.
गुरुवार२० फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या बॅचमध्ये ३० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी यांनी दिली.
५४० तासांच्या कालावधीच्या या प्रशिक्षणक्रमात विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये, व्यावसायिक ज्ञान व रोजगारक्षमतेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रकल्प कार्य व विविध अभ्यासेतर उपक्रमांचा समावेश आहे.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे महत्त्वाचे घटक..
सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षण: अग्निशामक यंत्राचा वापर, कृत्रिम श्वास आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे.
सौर ऊर्जेचे तांत्रिक ज्ञान - नैसर्गिक ग्रहांची हालचाल, सूर्यप्रकाशाचा मार्ग, किरणोस्तराची तीव्रता मोजणे, सौर नकाशा तयार करणे.
इंस्टॉलेशन प्रक्रिया - साइट तपासणी, लेआउट समजून घेणे, पॅनेल माउंटिंग, खबरदारीचे उपाय व सिस्टमचे प्रभावी कार्य सुनिश्चित करणे.
हा प्रशिक्षणक्रम केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांना नोकरी आणि उद्योजकतेसाठी सक्षम करण्याचा उद्देश आहे. सौर ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्रोत असल्याने पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी आणि ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौर पॅनल तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.