सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी - जिल्हाधिकारी

संगमनेर Live
0
सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी - जिल्हाधिकारी

◻️ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुण गौरव

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागून प्रशासनात एक सक्षम व कार्यक्षम टीम निर्माण व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

महसुल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुण गौरव कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, श्रीकांत चिंचकर, सायली सोळंके, गौरी सावंत, शाहूराज मोरे, अरुण उंडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, धुळे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकवत चांगली कामगिरी केली. पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग कमी आहे. महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये अधिक प्रमाणात सहभाग घेण्याची गरज आहे. 

पुढील वर्षी क्रीडा स्पर्धा आयोजनाची संधी आपल्या जिल्ह्याला मिळाली असून या स्पर्धांमध्ये जिल्ह्याने चांगली कामगिरी करावी यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. समितीने उत्कृष्ट खेळाडूंची निवड करत त्यांना प्रोत्साहन द्यावे. खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयी - सुविधा, साहित्याची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली.

अपर जिल्हाधिकारी कोळेकर म्हणाले, धुळे येथील स्पर्धेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असली तरी आपला जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

दरम्यान यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !