एकविराच्यावतीने महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा
◻️जागतिक महिला दिनानिमित्त ६ मार्च ते १० मार्च दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला व युवतींच्या सबलीकरणाकरता एकविरा फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ६ मार्च ते १० मार्च २०२५ या काळात भव्य महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली.
डॉ. थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे मागील तीन वर्षापासून महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे क्रिकेट सामने झाले आहेत. यामध्ये तालुक्यातील अनेक महिला भगिनींनी सहभाग घेतला आहे. यामुळे ही स्पर्धा राज्य पातळीवर पोहोचली आहे. सध्या देशामध्ये महिलांची आयपीएल सुरू असून ती मोठी लोकप्रिय झाली आहे.
यावर्षीही ६ मार्च ते १० मार्च २०२५ या कालावधीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा होणार आहेत. शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला महिला गट असे स्वरूप असून तीनही गटातील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये व तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांसारखे हिरवळीवर हे सामने खेळवले जाणार असून सर्वांना सनकोट व कॅप दिली जाणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
सर्व सामन्यांसाठी प्रवेश विनामूल्य असून या स्पर्धांमधून जास्तीत जास्त संघांनी आपला सहभाग नोंदवावा. प्रवेश व संपर्कासाठी महिला व युवतींनी ७०५७०३७०३७ या क्रमांकावर अथवा यशोधन कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..
९ व १० मार्च रोजी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने क्रीडा संकुल येथे, तालुक्यातून येणाऱ्या सर्व महिला भगिनी, सर्व खेळाडू व उपस्थित महिला भगिनींकरता सर्व प्रकारची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या महिला आरोग्य तपासणीच्या सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.