राजकारणातील देवमाणूस!

संगमनेर Live
0
राजकारणातील देवमाणूस! 

राजकारणातील राजहंस!

महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. देशाला विचारातून आणि कृतीतून दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपणारे सध्याच्या राजकारणातील सर्वांना सोबत घेऊन गोरगरिबांच्या विकासासाठी अविरत काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील राजहंस व्यक्तिमत्व असून सामान्य माणसांसाठी देवमाणूस आहेत.

राजकारण हे कधीही सत्तेसाठी नव्हे तर गोरगरिबांच्या कल्याणासाठी तत्त्वांनी करायचे असते. हा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विचार घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात मोठे योगदान दिले आहे. दर पंचवार्षिकला नवे नेते येतात आणि जातात. मात्र प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे मोजके नेते असतात. त्यामध्ये सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वरचा क्रमांक लागतो.

१९८५ मध्ये खास जनतेच्या आग्रहास्तव लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणात आले. पाणी प्रश्नासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले. यातूनच १९८९ मध्ये अकोले आणि संगमनेर तालुक्याला प्रवरा नदीवरील ३० टक्के हक्काचे पाणी मिळाले. यासाठी मोठा संघर्ष त्यांनी केला. पाण्याबरोबर समृद्ध शेती निर्माण करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून पाईपलाईनचे जाळे निर्माण केले. दुग्ध व्यवसाय वाढीसाठी गावोगावातून सोसायटी निर्माण करून संगमनेर तालुका दूध उत्पादनात राज्यात अग्रेसर बनवला आज संगमनेर तालुक्यामधून दररोज ९.५ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे ते फक्त थोरात साहेबांच्या परिश्रमामुळे.

सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास या मूलभूत क्षेत्रांमध्ये सातत्याने रचनात्मक काम करताना संगमनेरच्या सहकाराने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशाला दिशा दिली. गुणवत्ता पूर्ण कामामुळे थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शिक्षण संस्था, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, सह्याद्री शिक्षण, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा बँक या संस्था यांसह सर्व संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर विविध मानांकने मिळवले. नागरिक, सभासद, जनता यांचा मोठा विश्वास संपादन करताना या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरची बाजारपेठ फुलली.

आज संगमनेर हे राज्यातील सर्वात सुकून असलेले वैभवशाली शहर आहे. यामध्ये हायटेक बसस्थानक ,प्रांताधिकारी कार्यालय, न्यायालय इमारत, तहसील कार्यालय, कवी आनंद फांदी  नाट्यगृह, नगरपालिका कार्यालय पंचायत समिती, बायपास या अद्यावत कार्यालयांबरोबरच संगमनेर शहरासाठी २४ तास स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणारी थेट निळवंडे पाईपलाईन योजना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राबवली. राज्यामध्ये पाण्याचा तुटवडा असताना संगमनेर मध्ये मात्र सर्वांना दररोज स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे. ते तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळेच.

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालव्यांची निर्मिती हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पुढील पन्नास पिढ्यांसाठी उभे केलेले ऐतिहासिक काम. १९९९ मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करणारे माजी मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातूनच डावा आणि उजवा कालवा पूर्ण झाला. चार जून २०२३ रोजी या कालव्याचे पाणी संगमनेर तालुक्यात आले. सर्वत्र आनंद उत्सव झाला. आज हे पाणी दुष्काळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आले आहे अनेक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु खरे काम हे जलनायक बाळासाहेब थोरात यांनीच केले आहे. हे पूर्ण श्रेय त्यांचेच असल्याचे संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा व  महाराष्ट्र जाणतो आहे.

राज्यात महसूल मंत्री, कृषिमंत्री, शिक्षण मंत्री, रोहयो मंत्री, राजशिष्टाचार मंत्री, ऊर्जामंत्री, जलसंधारण मंत्री अशा विविध महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळताना त्यांनी अत्यंत लोकाभिमुख काम केले. म्हणून चांदा ते बांदा आदराचे स्थान त्यांनी निर्माण केले. विकासाबरोबर समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण या सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपला आणि म्हणून साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा आवर्जून राज्याचे सुसंस्कृत भावी नेतृत्व म्हणून उल्लेख केला.

पक्षनिष्ठ, स्वच्छ व प्रामाणिक नेतृत्व, जनतेचे प्रेम, सहकाऱ्यांचा विश्वास यामुळे काँग्रेसचे सर्वाधिक यशस्वी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ गटनेते म्हणून त्यांनी काम केले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटी मध्ये पहिल्या २१ महत्त्वाच्या नेत्यांमध्ये स्थान मिळाले. याबाबत अत्यंत नम्रतापूर्वक लोकनेते बाळासाहेब थोरात सांगतात की हा जनतेच्या प्रेमाचा आदर आणि नेतृत्वाचा विश्वास यांचा संगम आहे.

राज्यात काम करताना संगमनेर तालुक्याच्या गावागावात विकासाची मोठमोठी कामे त्यांनी उभी केली, देवकौठे ते बोटा असे १०० किलोमीटर विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सलग आठ वेळा ५० हजार पेक्षा जास्त मतांनी विजय होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जिल्ह्यामध्ये सहकारातील विविध संस्थांमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मान्य आहे.

२०२४ च्या आणीबाणीच्या लढाईमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांनी सांभाळली. महाविकास आघाडी करून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात पुढे आले. परंतु ईव्हीएम ने घात केला आणि अन संगमनेरच्या अनपेक्षित निकालाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. सर्वसामान्य जनता धाय  मोकलून रडली.

अनेकांच्या विजयापेक्षा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची चर्चा जास्त झाली. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या सर्वांमध्ये चर्चा झाली. राज्य व राष्ट्रीय पातळीवर संगमनेरचा निकालाबाबत असे होणे हे होणे शक्य नाही यावर विचार मंथन झाले. हा निकाल अनाकलनीय आहे. म्हणून सर्व क्षेत्र पाहू लागले. पत्रकारिता, साहित्य, कला, शेती आणि तरुणाई मध्ये सुद्धा या निकालाबद्दल चिंता मोठी निर्माण झाली.

प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. महाराष्ट्र हळहळला होता. परंतु आपल्या जनतेने आपल्यावर खूप प्रेम केले आहे. म्हणून स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात जनतेला सावरण्यासाठी पुढे आले. अनपेक्षित आहे. परंतु पुन्हा एकदा आपल्याला कामाला लागायचे आहे असे म्हणून सर्वांना धीर दिला. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या स्टेटसवर फक्त आणि फक्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकरता माणसा उधळीन जीव तुझ्या पायी हे गीत झळकले. तसे माय बहिणींच्या डोळ्यातील अश्रू तरळले.

हा महाराष्ट्र आणि संगमनेर तालुका आहे पुन्हा एकदा जोमाने पुढे जाणार आहे. जीवाला जीव देणारी माणसं जोडणाऱ्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या करता आज प्रत्येक जण जीव ओवाळून टाकत आहे. टाकणार सुद्धा आहे. हीच साहेबांची मोठी संपत्ती आहे. केलेले काम जपलेली माणसं याच बळावर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे नाव प्रत्येकाच्या पुढे असणार आहे. किंबहुना संपूर्ण राज्याला पुन्हा एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत वारसा जपणाऱ्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची गरज आहे.

गरज आहे ती देव माणसाची,

गरज आहे ती राजकारणातील राजहंसाची,

गरज आहे ती समाजकारणातील संताची.

आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयात स्थान असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात या आमच्या दैवतास वाढदिवसानिमित्त तमाम जनतेच्या वतीने व अमृत  उद्योग समूहाच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा!

नामदेव कहांडळ
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !