थोरात कारखान्याचा इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प कार्यान्वित
◻️ दररोज ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती आणि ताशी १८०० युनिटची होणार वीज निर्मिती
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे. अत्यंत पारदर्शीपणे, व काटकसरीने कारखान्याचे कामकाज सुरू असून या कारखान्याने नेहमीच देशातील सहकारासाठी दिशादर्शक काम केले आहे. नव्याने विस्तारित इथेनॉल प्रकल्पातून दररोज ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती व बॉयलर वाफेवर १.८० मेगा वॅट क्षमतेचा टरबाइन चालू ताशी १८०० युनिट वीज निर्मिती होणार असून यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार मोठा लागणार आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित आसावणी प्रकल्प व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, शंकरराव खेमनर, आर. बी. रहाणे, लहानभाऊ गुंजाळ, इंद्रजीत थोरात, व्हाईस चेअरमन संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, मधुकरराव नवले, सुरेश गडाख, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते .
या प्रसंगी सन २०२४-२५ या गणित हंगामातील ८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सहकारासाठी दिशादर्शक काम केले असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने ५५०० मे टन क्षमतेच्या निर्मितीचा नवा कारखाना उभा केला. याचबरोबर ३० मेगा वॅट वीज निर्मिती ही सुरू झाली. आता नव्याने विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पातून प्रतिदिन ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे.
याचबरोबर बाहेर पडणारे सांडपाणी हे वाफेद्वारे उकळून घट्ट केले जाणार आहे. आधुनिक एनसीनरेशन बॉयलर मध्ये जाळले जाऊन त्यातून पोटॅशियम युक्त राख तयार केली जाणार आहे. ही राख अमृतशक्ती दाणेदार खतांमध्ये मिसळली जाऊन अधिक गुणवत्तापूर्ण खतांची निर्मिती करण्यात येणार आहे. याचबरोबर बॉयलरच्या वाफेवर १.८० मेगा वॅट क्षमतेचा टर्बाईन चालून ताशी १८०० युनिट वीज निर्मिती होणार आहे. याच विजेचा वापर डिस्टलरी प्रकल्पासाठी केला जाणार आहे.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. साखर ही सर्वात शुभ्र व गुणवत्तेची आहे. अनेक दिवसांच्या कष्टातून कारखान्याचे वैभवाचे दिवस उभे आहे. चांगल्या कामामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिक मिळाले आहेत. कारखान्यामुळे शेतकरी सभासद व कामगार यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. आता काहीजण अफवा पसरवणारे येतील. मनभेद करतील. त्यांना वेळीच रोखा. आपला सहकार तालुका जपण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र रहा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत काटकसरीने आणि पारदर्शकपणे हा कारखाना चालवला जात आहे. व्यवस्थापनाने कायम योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ झाला आहे.
यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीननाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, सौ. मंदाताई वाघ, श्रीमती मीराबाई वर्पे, रामदास वाघ, संभाजीराव वाकचौरे, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. तर व्हाईस चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस उत्पादक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.