क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त यशोधन मध्ये अभिवादन
संगमनेर LIVE | महिलांना शिक्षण मिळावे, समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी स्वतःच्या अंगावर दगड, गोटे, शेण आणि प्रचंड सामाजिक रोष पत्करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणामधून महिलांच्या विकासाचे द्वार खुले केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
यशोधन कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. प्रमिलाताई अभंग, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब पवार, तात्यासाहेब कुटे, डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले की, महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाशी मोठा संघर्ष केला. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणातून महिलांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या केल्या. महिला शिक्षित व्हाव्या याकरता पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा काढली. आज पुरुषांबरोबर विविध क्षेत्रांमध्ये महिला योगदान देत आहेत याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना असल्याचे ते म्हणाले.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे खूप अवघड होते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने चूल आणि मूल हेच महिलांचे जीवन होते. मात्र अनेक सामाजिक विरोध स्वीकारात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळावे त्या शिक्षित व्हाव्यात त्यांना समाजात सन्मान मिळावा. याकरता १८५२ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या महिला शिक्षिका असणाऱ्या सावित्रीबाईंनी शिक्षणातून महिलांना पुढे आणले. आज महिला सर्व क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत याचे श्रेय हे सावित्रीबाई फुले यांना असल्याचे त्या म्हणाल्या.