संगमनेर येथील श्री नारायण महाराज आश्रमात सामुदायिक महाआरतीचे आयोजन
◻️ दत्त महाराजांच्या पादुका व अण्णा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
◻️ दर गुरुवारी भाविकांना आरतीचा लाभ घेण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील प. पू. श्री श्री नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच त्यांचे उत्तराधिकारी प. पू. टेंभे स्वामींच्या प्रेरणेने प. पू. नारायण महाराज आश्रम, संगमनेर महाविद्यालया समोर असलेल्या आश्रमामध्ये सामुदायिक महाआरती सोहळा व महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम दर गुरुवारी रात्री ८ वाजता भजन व आरती याद्वारे संपन्न होतो.
यावेळी उपस्थित भाविकांना आमटी, भात व शिऱ्याच्या प्रसादाचे वाटप केले जाते. या ठिकाणी अन्नदात्यांची पुढील तीन महिने बुकिंग झालेली असते. अनेक भाविक दोघे - तिघे एकत्र येऊन देखील अन्नदान करतात.
आमदार अमोल खताळ यांनी देखील दोन वेळा अन्नदान केले असून वेळोवेळी आरतीला ते येत असतात. आरती आधी नारायणपूर येथील शिष्यगण अण्णा महाराजांनी दिलेले ज्ञान आणि दत्तसेवेचे महात्म्य सांगतात. अशा रीतीने सर्व भाविक या सोहळ्यात आनंदाने भक्तिमय वातावरणात हा गुरुवारचा सोहळा नियमितपणे साजरा करतात.
प. पू. श्री श्री नारायण महाराजांचे वास्तव्य तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून प. पू. टेंबे स्वामी यांचे देखील या पावन भूमीमध्ये वास्तव्य राहिलेले आहे. या ठिकाणी नियमित येणाऱ्या बऱ्याचशा भाविकांना अतिशय चांगले अनुभव आलेले आहेत. गुंजाळवाडी येथील दानशूर व्यक्ती दगूभाऊ गुंजाळ यांनी शिष्यांच्या नावावर २००१ यावर्षी बक्षिस पत्राद्वारे १० गुंठे जागा दान केली आहे.
दरम्यान याठिकाणी अतिशय सुंदर अशी शेड निवारा बांधण्यात आला आहे. आत मध्ये दत्त महाराजांच्या पादुका व अण्णा महाराजांचा भव्य फोटो आहे. तालुक्यातील भाविकांना नारायणपूरला नियमित पणे जाणे शक्य होत नसल्यामुळे या ठिकाणी येऊन आरतीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन दत्त सेवेकरी यानी केले आहे.
बातमी सौजन्य - पत्रकार संजय गोपाळे, संगमनेर