पानोडी गावात महिलांच्या पुढाकारातून दारूबंदीचा ठराव मंजूर!
◻️ महिलांच्या लढ्याला यश ; पंचक्रोशीत महिलांच्या धाडसाचे कौतुक
◻️ लगतच्या गावात तळीरामाच्या घिरट्या वाढणार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात महिलांच्या पुढाकारातून दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. गावात मागील अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने दारूची विक्री होत होती. त्याविरोधात महिला आक्रमक झाल्या होत्या.
त्यांनी दारूबंदीची मागणी करत दारूबंदी करण्यासाठी मंगळवारी तातडीने ग्रामसभा बोलवली होती. यावेळी महीलासह मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी एकमुखी दारूबंदीचा ठराव मंजूर केला. त्यामुळे गावातील महिलांच्या लढ्याला यश आले आहे.
पानोडी हे एक ऐतिहासिक व धार्मिक परंपरा जपणारे गाव म्हणून पंचक्रोशीत परिचित आहे. मात्र काही दिवसांपासून गावात लपून छपून अवैध दारू व्रिकी सुरू होती. यामुळे गावातील नागरिकामध्ये कौटुंबिक वादात वाढ झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.
त्यामुळे गावात वारंवार अशांतता व कलह निर्माण होत होते. तसेच गावातील तरुणांना देखील दारुचे व्यसन लागण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील महिलांनी पुढाकार घेत प्रसंगी रस्त्यावर उतरून दारु विक्री विरोधात आंदोलन केले व दारुबंदी ठराव करावा यासाठी आग्रह धरला.
यासाठी गावातील महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात दारुबंदीचा अर्ज देवून दारूबंदीची मागणी केली होती. त्यामुळे मंगळवारी विशेष ग्रामसभा घेवून दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आता हा दारूबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे.
यावेळी संरपच गणपत हजारे, उपसंरपच विक्रम थोरात, विनायकराव थोरात, रावसाहेब घुगे, गोपाळ थोरात, बबनराव कराड, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, रंगन्नाथ जाधव, महादू खेडकर, कैलास कराड, बाळू नागरे, रंगन्नाथ मुंढे, संजय जाधव, मधुकर कदम, विजय कदम, सुदाम सांगळे, रमेश मुंढे, अलिम सय्यद, गणेश कदम, ग्रामसेवक सुरेंद्र ब्राम्हणे आदीसह महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या ठरावामुळे गावातील महिलांना होणारा त्रास कमी होऊन दिलासा मिळणार असला तरी, प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी कशी करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, दुसरीकडे गावातील तळीरामांची चांगलीच अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे त्यांचे शेजारील गावात घिरट्या घालण्याचे प्रमाण वाढेल यात मात्र शंका नाही.
पानोडी गावच्या महिलांनी गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करुन परिसरातील गावांना देखील यासाठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे लगतच्या गावानी देखील या चांगल्या निर्णयाचे स्वागत करत आपल्या गावात देखील दारुबंदी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याची भावना नागरीकानी व्यक्त करुन पानोडी गावच्या महिलांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.