प्रतापपूर येथे संगीत श्रीमत भागवत महापुराण कथेची उत्साहात सांगता
◻️ केवळ महिला दिनी नव्हे तर, बाराही महिने महिलेचा सन्मान करा - सौ. शालिनीताई विखे
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील श्री शनि महाराज मंदिर वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांनी भव्य संगीत श्रीमत भागवत महापुराण कथेचे आयोजन केले होते. या मंगलमय उत्सवाची रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात ह.भ.प. माऊली महाराज सालगांवकर यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
८ मार्च रोजी असलेल्या महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते उपस्थित भारतीय सैन्य दलातील जवानाच्या आणि पोलीसांच्या पत्नी, डॉक्टर, इंजिनिअर, आरोग्य सेविका, परमार्थात योगदान देणाऱ्या जेष्ठ महिला व अपंग महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. विखे पाटील यांनी “महिलांचा सन्मान हा केवळ महिला दिनी नव्हे तर, बाराही महिने करा.” असे आवाहन करताना सुंदर सप्ताह आयोजनाबाबत ग्रामस्थाचे कौतुक केले.
याआधी रविवारी सकाळी ह.भ.प. माऊली महाराज सालगांवकर यांचे काल्याचे किर्तन पार पडले. या भव्य श्रीमत भागवत महापुराण कथेचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उत्सव काळात अन्नदान, तसेच शक्य होईल त्या माध्यमातून मदत करणाऱ्या दानशूर नागरीकांचे देखील ग्रामस्थांनी आभार मानले. दरम्यान या सुंदर सप्ताह सोहळ्यासाठी प्रतापपूर ग्रामस्थ आणि शनैश्वर भक्त गण यांनी परिश्रम घेतले असून पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात उत्सवाचे आयोजन करण्याची ग्वाही दिली.