आश्वी आणि मांचीला जोडणाऱ्या डाव्या कालव्यावरील पुलाची दुरावस्था
◻️ संरक्षण कठडे तुटल्याने मृत्यूचा सापळा देतोय अपघाताला निमंत्रण
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथून मांचीला जाणाऱ्या रस्त्यावर प्रवरा डावा कालवा असून याठिकाणी असलेल्या महादेव पुलाचे कठडे तुटल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी या पुलाचे लोखंडी कठडे व स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
आश्वी बुद्रुक ते मांचीहिल शिक्षण संकुल, मांची गाव तसेच लोणी - संगमनेर राज्यमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवरा डावा कालवा आहे. या कालव्यावर दगडी बांधकाम असलेला जुना पुल आहे. त्याला पंचक्रोशीत महादेव पुल म्हणून ओळखले जाते. उंबरी बाळापूर, निमगावजाळी व अन्य गावातील नागरीक देखील रहदारीसाठी या पुलाचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून या पूलाच्या दोन्ही बाजूने असणारे लोखंडी पाईपचे कठडे तुटले आहे. तर, दिवसेंदिवस पुलाची अवस्था वाईट झाल्यामुळे वाहतुकीसाठी हा पुल धोकादायक बनला आहे.
दोन वर्षांपूर्वी ऊस तोडणी मजुरांच्या ९ वर्षीय मुलाचा यांचं परिसरात पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच लहान मोठे अपघात हे नियमितपणे घडत असतात. यामार्गावर शाळा, महाविद्यालये आणि शेतीची संख्या मोठी असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमी मोठी वर्दळ आहे. त्यातच परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर व विद्यार्थ्यांची सायकलने प्रवास करण्याची संख्याही मोठी आहे.
दरम्यान सध्या पाण्याचे आवर्तन सुरु असल्याने कालवा दुथडी भरुन वाहत आहे. रात्री अपरात्री नवख्या वाहनचालकांना अंदाज न आल्यास याठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे पुलावरील दोन्ही बाजूच्या संरक्षण कठड्यांची त्वरीत दुरुस्ती करण्याबरोबरच येथे स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात यावे. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
प्रवरा डाव्या कालव्यावरील महादेव पुल हा फार जुना झाल्यामुळे तो दिवसेंदिवस जीर्ण होत चालला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाकडे आमचा नियमित पाठपुरावा सुरू असून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालावे यासाठी विनंती करणार आहोत. तसेच भविष्यात या ठिकाणी नवा पुल उभारला जावा अशी मागणी देखील मंत्री विखे पाटील यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रिया अँड. शाळीग्राम होडगर यांनी दिली.