सुप्रसिद्ध साहित्यिक सोनाली नवांगुळ यांना ‘अग्निशिखा पुरस्कार’ जाहीर
◻️ जागतिक महिला दिनानिमित्ताने स्नेहालय परिवाराची घोषणा
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | स्नेहालय ही सामाजिक संस्था गेली ३५ वर्षे समाजातील सर्वात वंचित आणि उपेक्षित घटकांच्या जीवन परिवर्तनाचे कार्य करीत आहे. सध्या सुमारे २० हजार निवासी आणि अनिवासी लाभार्थ्यांपर्यंत स्नेहालयाची सेवा दररोज पोहोचते. www.snehalaya.org या वेबसाईटवर स्नेहालयाच्या कार्याचे सर्व तपशील उपलब्ध आहेत.
स्नेहालयाच्या निंबळक (ता. जि. अहिल्यानगर) येथील पुनर्वसन संकुलात ४०० मुलांसाठीची दर्जेदार इंग्रजी माध्यम शाळा, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे वसतिगृह, समस्याग्रस्त आणि अत्याचारित १२० महिलांसाठीचे आधारघर, रोजगार प्रशिक्षण केंद्र, ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, देह व्यापारातून मुक्त केलेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी उभारलेले प्रतिष्ठा भवन ई. सेवा प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सर्व सेवा लाभार्थ्यांना निःशुल्क दिल्या जातात.
अठरा वर्षे पूर्ण झालेल्या समस्या ग्रस्त आणि अत्याचारीत महिलांसाठी स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प दिवस रात्र कार्य करत आहे. या महिलांसाठी कायदेशीर मदत, समुपदेशन, रोजगार, आधार घर अशा सेवा पुरविण्याचे आणि त्यांच्यात पुन्हा नवीन जीवन जगण्याची आशा निर्माण करण्याचे काम स्नेहाधार करते.
याच महिलांकरीता दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन स्नेहालय मध्ये केले जाते. यामध्ये मनोरंजन, खेळ, प्रेरणात्मक कार्यशाळा,सुगम संगीताचे कार्यक्रम इत्यादि कार्यक्रम आयोजित केले जातात.
जागतिक महिलादिन निमित्त या वर्षीपासून स्नेहालय, अहिल्यानगर यांच्याकडून कर्तृत्ववान महिलांसाठीचा अग्निशिखा पुरस्कार देण्यात येत आहे. यासाठी त्री सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतातील कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलेची निवड या पुरस्कारकरिता करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून मानपत्र, रुपये एकवीस हजार रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षीचा प्रथम पुरस्कार कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिका सोनाली नवांगुळ यांना जाहीर झाला आहे.
दरम्यान दिनांक ८ मार्च रोजी दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत सुप्रसिद्ध लेखिका मेधा भास्करन यांच्या हस्ते मुथा सभागृह, स्नेहालय एमआयडीसी येथे पुरस्काराचे वितरण होईल. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे.