थोरात कारखान्यांकडून मृत सभासदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखाची मदत
◻️ कोल्हेवाडी व आश्वी बुद्रुक येथील सभासदांच्या कुटुंबियांना धनादेशाचे वितरण
◻️ अपघातात झाला होता दोघांचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी व सभासदांचे हित जोपासले आहे. कारखान्याने सर्व सभासदांचा दोन लाख रुपये विमा उतरवला असून अपघातग्रस्त झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांच्या धनादेशाचे वितरण थोरात यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृह येथे कोल्हेवाडी येथील स्वर्गीय साहेबराव पुंडलिक वामन व आश्वी बुद्रुक स्वर्गीय जाखोजी राणू पिलगर यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, शेअर्स विभागाचे गीताराम साबळे आदी उपस्थित होते.
थोरात सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त काटकसर व पारदर्शकता जपताना कायमची उच्चांकी भाव दिला आहे. याचबरोबर कारखान्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तेतून अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
शेतकरी व सभासदांचे हित जोपासताना तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्या धावपळीचे जीवन वाढल्यामुळे कारखान्याने सुरक्षितता म्हणून सर्व सभासदांचा दोन लाख रुपयांचा अपघातग्रस्त विमा उतरवला आहे. मागील काही महिन्यात आश्वी बुद्रुक येथील जाकुजी राणू पिल्लू यांचा नगर मनमाड हायवेवर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. तर कोल्हेवाडी येथील साहेबराव कुंडलिक वामन यांना मोटरसायकलवर मागून वाहनाने धडक दिल्याने डांबरीवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या दोन्ही सभासदांच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. वामन व पिलघर कुटुंबीयांचे बाळासाहेब थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी सांत्वन केले होते. याचबरोबर मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. यातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या सहकार्याने काढलेल्या वैयक्तिक विमा अपघात योजनेमधून शेअर्स विभागाने पुढाकार घेत त्यांना दोन लाख रुपयांचा विमा अपघात विमा मिळून दिला.
कारखान्याने कायम सभासदांची काळजी घेतली..
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद शेतकरी यांची काळजी घेतली असून प्रशासन व सभासद यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते आहे. ज्या ज्या वेळी शेतकरी व सभासदांवर संकट आले, त्यावेळी कारखाना मदतीला धावला. आमच्या कुटुंबीयावरही आघात झाल्याने कारखान्याने अत्यंत मोलाची मदत केली असल्याचे वामन आणि पिलगर कुटुंबीयांनी म्हटले आहे.