जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

संगमनेर Live
0
जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

◻️ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ निरोप समारंभप्रसंगी झाले भावूक 

◻️ साखर आयुक्तपदी जिल्हाधिकारी सालीमठ यांची बढती 



संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | समाजाच्या सर्वच स्तरातील घटकाच्या कल्याणाची, त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी प्रशासकीय सेवेतून मिळत असते. याच मिळालेल्या संधीतून गत दोन वर्षात विकासकामांतून जिल्ह्याच्या वाढलेल्या लौकिकात सर्व विभागांचे सहकार्य मोलाचे ठरले. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य तसेच जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम कधीही विसरू शकणार नसल्याचे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, शासकीय सेवेमध्ये वेतन घेऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते.  जनकल्याणाची भावना मनी बाळगत दुसऱ्याचं दु:ख, त्यांच्या अडचणी आपल्या समजून घेत शासनाच्या विविध योजनांच्या लाभातून सामान्यांचे जीवन सुकर करण्याचे काम व्हावे. आपल्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक अभिनिवेश न बाळगता संघभावनेतून प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे.

शुद्ध विचार, शुद्ध आचरण, निष्कलंक चारित्र्य, त्याग भावना या बाबींचा वापर करत आपण प्रत्येक कामांमध्ये यश प्राप्त करु शकतो. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना सातत्याने या गोष्टी मनाशी बिंबवत आपल्या पदातून सामान्य जनतेची सेवा करुन समाधान शोधण्याचे काम केले. 

लोकसभा, विधानसभेसारख्या निवडणूका सर्वांच्या सहकार्यातून अत्यंत पारदर्शी व यशस्वीपणे पार पाडण्यात यश मिळाले. आपला जिल्हा राज्यात प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. तसेच ॲग्रीस्टॅक योजनेचा पाच लाखाचा टप्पाही सर्वांच्या सहकार्यानेच यशस्वीपणे पार करु शकलो. आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग सामान्यांच्या कल्याणासाठी करुन आपल्या खुर्चीचे महत्त्व अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातल्या महत्त्वाच्या साखर आयुक्तपदी सालीमठ यांची बढती झाल्याच्या मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत आशिष येरेकर म्हणाले, जिल्हाधिकारी सालीमठ यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामातून जनमानसांमध्ये एक ठसा निर्माण केला आहे. प्रशासनाचे लीडर म्हणून काम करत असताना शांत, संयमीपणाबरोबरच त्यांची अंगी असलेली शालिनता हे गुण निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. जिल्ह्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका अत्यंत शिस्तबद्धीरितीने पार पडल्या. सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकसंघ ठेवत जिल्ह्याला पुढे नेण्यासाठीचे त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याचेही ते म्हणाले.

प्र. जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले, गत दोन वर्षाच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे. या योजना राबवत असताना एक सातत्यपूर्ण पाठपुरावा, त्यातील अडचणींची सोडवणूक, संबंधित विभागाला मार्गदर्शन या सर्व बाबी अत्यंत संयमीपणे सालीमठ यांनी केल्या. केंद्र शासनाच्या ११ महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आपला जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. जिल्ह्यात झालेल्या निवडणूका, शासन आपल्या दारी, लाडकी बहिण यासारखे अनेक मोठ्या कार्यक्रमांबरोबरच जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या दौऱ्यांचे नियोजनही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सुक्ष्म नियोजनातून यशस्वीरित्या पार पडू शकले. 

नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन विविध योजना राबविण्यास त्यांनी मोठे पाठबळ देत त्या पुर्णत्वास नेण्यासाठीही वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले हे कार्य कायमस्वरुपी स्मरणात राहण्याबरोबरच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी ‘पाणीदार अहिल्यानगर’ या पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी मावळते जिल्हाधिकारी सालीमठ यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, गौरी सावंत, शैलेश हिंगे, तहसिलदार महेश सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त खांडकेकर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, प्रा. दादा कर्जुले, प्रशांत हासे, योगेश मिसाळ, श्रद्धा पारगावकर आदींही मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !