प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर करावा - प्रा. रंगनाथ पठारे
◻️ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ११ वर्ष लागली याबाबत व्यक्त केली खंत
◻️ जयहिंद व सह्याद्री परिवाराच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन
संगमनेर LIVE | भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून कमी सैन्यात लढण्यासाठी महाराष्ट्राने गनिमी कावा युद्धतंत्र जगाला दिले. जगातील प्रमुख १० भाषांमध्ये मराठीचा समावेश असून जो माणूस भाषा सोडतो त्याची भाषा संपते म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर करावा असे आवाहन मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृह येथे जयहिंद लोकचळवळ व सह्याद्री परिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. संतोष खेडलेकर, प्रा. चं. का. देशमुख, प्रा. हिरालाल पगडाल, कवी संतोष पवार, कवी पोपटराव सातपुते, अरविंद गाडेकर, अनिल देशपांडे, आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, सिताराम राऊत, सुरेश परदेशी, उल्हास पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती शाल बुके सन्मान देऊन प्रा. डॉ. रंगनाथ पठारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रंगनाथ पठारे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी २०१३ मध्ये सर्व पूर्तता पूर्ण केली होती. कोणतीही अडचण नव्हती. मात्र तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अकरा वर्ष लागले हे न समजण्यासारखे आहे. प्रत्येक वेळी काही ना काही निमित्त आडवे आले. किंवा यामध्ये सुद्धा राजकारण झाले.
या मराठी भाषेला मोठी समृद्ध परंपरा असून प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर केला पाहिजे. मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत पाठविले पाहिजे. इंग्रजी शिकली पाहिजे. परंतु प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे म्हणजे मुलांचा विकास होईल असे सांगताना महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील इंग्रजीचे प्राध्यापक ही मराठीतूनच शिकले आहे. हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. याचबरोबर अभिजात भाषेला दर्जा मिळवण्यासाठी हरी नरके यांसह विविध लेखकांनी मोठी मदत केली असल्याचे ते म्हणाले.
डॉ. तांबे म्हणाले की, भाषा ही फक्त संवाद नव्हे तर संस्कृती आणि भावनेचे प्रतीक आहे. प्रत्येक भाषा ही सुंदर असून सुंदर माणसाने तयार केली आहे. भाषेची कधीही तुलना करू नका मराठी भाषेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासह विविध संत, समाज सुधारक, कवी, लेखक व साहित्यिकांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र मराठी भाषा कमकुवत होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
महापुरुषांचे विचार हे प्रत्येकाच्या मनात आणि कृतीत हवे. ज्या प्रदेशात राहतो ती भाषा आनंदाने स्वीकारली पाहिजे. भाषा ही एकात्मतेचे प्रतिक असून भाषा धर्म जात ही माणसे जोडणारी असावी तोडणारी नसावी असे ही ते म्हणाले.
याप्रसंगी प्राचार्य के. जी. खेमनर, उपप्राचार्य संजय सुरसे, प्रा. लक्ष्मण घायवट, डॉ. राजेंद्र जोरवर, अनिल सोमणी, प्रा. सुशांत सातपुते, मिलिंद औटी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण घायवट यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी तर प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले.
संगमनेर हे जिल्ह्यातील समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले शहर..
संगमनेर शहर व तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सांस्कृतिक समृद्धता असलेला तालुका आहे. येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना हा मोठा वारसा आहे. यामुळे मी कायम संगमनेर शहर व तालुक्याच्या प्रेमात असल्याचेही ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी म्हटले आहे.