३ हजार २०० मुलीं व महिलांच्या सहभागात महिला क्रिकेटचा थरार सुरू
◻️ एकविरामुळे महिला व मुलींना क्रीडा स्पर्धांसाठी मोठे व्यासपीठ - डॉ. सुधीर तांबे
◻️ संगमनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धाचा शुभारंभ
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. मागील तीन वर्षापासून मुलींना क्रिकेट खेळण्याकरीता संधी मिळावी यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू असून याचा लौकिक आता राज्य पातळीवर झाला आहे. महिला व मुलींकरता हे एकविरा मोठे क्रीडा व्यासपीठ ठरले असल्याचे गौरवउद्गार माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
यावेळी ३ हजार २०० खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये महिला क्रिकेट व रस्सीखेचचा थरार सुरू झाला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. प्रमिलाताई अभंग, सौ. पुनम मुंदडा, सुनंदाताई दिघे, सायकलपटू प्रणिता सोमन, सौ. रुपाली औटी यांसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, सध्या देशांमध्ये वुमन प्रीमियर लीग सुरू आहे. आणि ही महिला क्रिकेट स्पर्धा लोकप्रिय ठरली आहे. मुलींच्या व महिलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मागील तीन वर्षापासून या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. ही स्पर्धा आता राज्य पातळीवर पोहोचली आहे. आरोग्य व महिला सबलीकरण साठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून काम होत असून त्यांनी स्वयंरोजगारासाठी केलेला इंदिरा महोत्सव हा सर्व महिलांसाठी व्यवसाय व उद्योजकता यासाठी मार्गदर्शक ठरला होता. या स्पर्धांमधील तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त मोठा सहभाग सहभाग हा कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
सौ. कांचनताई थोरात म्हणाल्या की, एकविरा फाउंडेशनच्या युवतींनी तालुक्यामधील महिलांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना केल्या आहेत. महिलांचे आरोग्य आणि सबलीकरणाकरता त्यांचे काम हे नक्कीच कौतुकास्पद असल्याच्या हि त्या म्हणाल्या.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महिला या विविध क्षेत्रात यशस्वी ठरल्या असून त्यांना क्रिकेट मध्येही करिअर साठी नवीन वाटा उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये महिला क्रिकेट हा खेळ लोकप्रिय झाला असून सांघिक नेतृत्व व सकारात्मकता यामधून वाढीस लागणार आहे.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर मधील अनेक गुणवंत खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर संगमनेरचा लौकिक वाढवत आहे. जिद्द आणि मेहनत केली तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. मुलींच्या करियरसह शिक्षण, आरोग्य आणि सबलीकरणासाठी एकविराच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्या म्हणाले. यावेळी प्रणिता सोमन ही ने तरुणींशी संवाद साधला.
याप्रसंगी विश्वासराव मुर्तडक, सुहास आहेर, गजेंद्र अभंग, अंबादास आडेप, संदीप लोहे, अजित काकडे, गणेश मादास, विष्णुपंत रहाटळ, बाबुराव गवांदे, के. जी. खेमनर, डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे, के. डी. देशमुख, मिलिंद औटी, पराग थोरात, सत्यजित थोरात, डॉ. वृषाली साबळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी संगमनेर शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मागील तीन वर्षापासून महिलांसाठी एकविराच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा होत असून या स्पर्धा लोकप्रिय ठरत आहे. यावर्षी या स्पर्धेमध्ये १७४ क्रिकेट स्पर्धा तर ९१ रस्सीखेच संघांनी सहभाग घेतला असून ३ हजार २०० युवती व महिलांचा सहभाग असल्याने ही स्पर्धा अत्यंत रोमांचकारी ठरणार आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरी, हिरवे मैदान, थेट लाईव्ह प्रक्षेपण, सर्व खेळाडू संघांना कॅप व सनकोट देण्यात आले असून षटकारा - चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजरात मैदान दुमदुमून जात आहे.