तीन महिन्यापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद!
◻️ १६ गावांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल
◻️ उन्हाबरोबरचं संगमनेरच्या जनतेला नेतृत्वाचे चटकेही लागलेत बसू?
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रवरेचे पाणी देवकवठेच्या टोकापर्यंत पोहोचवताना १६ गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजने मधून सातत्याने पाणी दिले. अनेक वेळा अडचणी आल्या त्यावर मात करून हे पाणी मिळत राहिले. मात्र मागील तीन महिन्यांपासून कोणत्याही गावांमध्ये पाणी योजनेचे पाणी मिळत नसल्याने १६ गावांमधील नागरिकांचे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले आहे. असा सुर लोकांमधून ऐकू येऊ लागला आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधून तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, काकडवाडी, देवकवठे, तिगाव, नान्नज दुमाला, कवठे कमळेश्वर, लोहारे, कासारे, वरझडी बुद्रुक, वरझडी खुर्द, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, करूले यांसह १६ गावांचा समावेश होतो. मागील तीन महिन्यांपासून ही प्रादेशिक पाणीपुरवठा बंद आहे. तलावाचे काम सुरू असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, यावर पर्याय म्हणून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मोटार टाकून चालवणे शक्य होते. मात्र प्रशासनाने याबाबत उदासीनता दर्शवली.
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे पाण्याची कमतरता भासत आहे. तळेगाव हा दुष्काळी पट्टा असून पिण्याच्या पाण्यासाठी थेट प्रवरेची पाईप लाईन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाली. मागील पंधरा वर्षे ही योजना सुरळीत चालू होती. विजेच्या बिलाअभावी अनेकदा वीज कनेक्शन कट केले गेले. मात्र थोरात यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजनांमधून विज बिल भरून ही योजना सुरू ठेवली. ज्या ज्या वेळा पाईपलाईन तुटली त्यावेळेस सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा मदतीला धावली.
इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री अपरात्री काम करून कारखान्याच्या यंत्रणेने १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी काम केले. त्यामुळे प्रत्येक गावाला वेळेवर पाणी मिळत होते. माजी मंत्री थोरात हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे जनतेला अडचण भासत नव्हती. या योजनेमध्ये काही अडचण आली तर तात्काळ सोडवली जायची. किंबहुना मंत्रिपदाच्या काळात अत्यंत व्यस्त कार्यक्रमातही थोरात यांनी कायम या योजनेची काळजी घेतली.
मात्र आता उन्हाच्या चटक्याबरोबर तळेगाव भागातील जनतेला नेतृत्वाच्या छत्राचे चटकेही बसू लागले आहे. मागील तीन महिन्यापूर्वी नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले आणि काही लोकांना हर्ष झाला. या परिसरामध्ये येऊन त्यांनी भाषणे केली मात्र, पिण्याच्या पाण्याकडे स्पेशल दुर्लक्ष केले. किंबहुना या योजनेबाबत त्यांना काही माहीत नाही किंवा त्यांचे पालकमंत्र्यांच्या शिवाय काही चालतही नाही. पाणी मिळत नसल्याने १६ गावांमधील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन तातडीने पाणी देण्यासाठी मागणी केली.
नान्नज परिसरातील इतक्या दिवस बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत होते ते आता मात्र गप्प आहेत. माय भगिनींना पाणी मिळत नाही. पाण्यासाठी वनवन सुरू आहे. लोकप्रतिनिधी एक शब्द बोलायला तयार नाही. कसा जाणार उन्हाळा असे म्हणून सर्व नागरिक हवालदिल झाले आहेत.
पाणी मिळावे याकरता बाळासाहेब थोरात यांच्याकडे माजी सभापती अविनाश सोनवणे, तीगावचे सरपंच डी. पी. सानप, काकडवाडीचे सचिन गायकवाड, लोहारे कासारे, देवकवठे, चिंचोली गुरव, नान्नज दुमाला, तळेगाव दिघे या विविध गावांमधील नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत तातडीने तळेगाव योजना सुरू करा अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला.
बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व नसल्याचे चटके आता जनतेला जाणू लागले..
कुणालाही विश्वास न वाटणारे प्रवरेचे पाणी जिल्ह्याच्या टोकावर थोरात यांनी पोहोचविले. घराघरात प्रवरेचे पाणी मिळत होते. अनेक अडचणीवर मात करून 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू होती. अडचणी आल्या की कारखान्याची यंत्रणा मदतीला येत होती. मात्र आता बाळासाहेब थोरात यांच्या न पटणाऱ्या पराभवाने जनता हवालदिल झाली असून त्यांचे नेतृत्व नसल्याचे चटके सर्वसामान्यांना जाणू लागले आहेत. पाणी मिळत नाही लाईटचा गोंधळ आहे. असुरक्षितता आहे आता करायचे काय असा प्रश्न तळेगावच्या महिला कार्यकर्त्या सुमनताई दिघे यांनी उपस्थित केला आहे.