जलनायक म्हणवून घेणाऱ्यानी तालुका ४५ वर्ष तहनलेला ठेवला? - खताळ
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आमदार अमोल खताळ यांची खरमरीत टिका
संगमनेर LIVE | मला निवडून येवून फक्त शंभर दिवस झाले आहेत. तुम्ही तर ४५ वर्षे या तालुक्याचे नेतृत्व केले. स्वता:ला जलनायक म्हणवून घेता, मग तालुका तहानलेला का ठेवला? असा प्रश्न उपस्थित करत हा पाणीप्रश्न शंभर दिवसांतच निर्माण झाला का? असा परखड सवाल आ. अमोल खताळ यांनी माजी आमदार थोरात यांचे नाव न घेता विचारला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत पाणी आणि वीजेच्या प्रश्नावरुन केलेल्या टिकेला उत्तर देताना आमदार खताळ म्हणाले की, पराभवानंतर का होईना आता कार्यकर्ते आणि जनतेच्या समोर खरे बोलण्याची वेळ आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर दिवसांतच त्यांना तालुक्यात पाणी प्रश्नाची टंचाई असल्याची जाणीव झाली.
यापूर्वी तर सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात होती. तरीही तालुक्याचा पाणीप्रश्न त्यांना सोडविता आला नाही. तालुक्यातील भगिनींच्या डोक्यावरील हंडा ते उतरवू शकले नाहीत. केवळ स्वता:ला जलनायक म्हणून मिरवूण घेणाऱ्यांनी जाणीव पुर्वक तालुका तहानलेला ठेवल्याची खरमरीत टिका त्यांनी केली.
तर, कोणीही पाणी पळवत नाही, यापूर्वी जायकवाडीला पाणी जात होते. तेव्हा विरोध करण्याची हिंमतही जे दाखवू शकले नाहीत, त्यांनी आता आम्हाला सल्ले देण्याचे काम करु नये असा टोला देखील यावेळी लगावला.
ते पुढे म्हणाले, तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत आपण अतिशय जागृत असून, दुष्काळी भागाला यापूर्वी महायुती सरकारमुळे आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने निळवंडे धरणाचे पाणी मिळाले. पठार भागातील पाणी प्रश्नासाठी महायुती सरकारच्या माध्यमातूनच आता उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन आपण पाणी मिळवून देणार आहोत.
तालुक्यातील माजी आमदारांना ४५ वर्षांत पाण्याचे प्रश्न सोडविता आले नाहीत. म्हणूनचं त्यांना जनतेने घरी बसवले आहे. वीजेच्या प्रश्नांबाबतही आपण अधिकाऱ्यांची सबस्टेशनमध्ये बैठक घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि लूट पूर्णपणे थांबली असून, मागणीप्रमाणे रोहित्र उपलब्ध होत आहेत. मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे नादुरुस्त रोहित्र दोन दिवसात बसवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यामुळेच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडवण्यात मला शंभर दिवसांत यश आले आहे.
विजेच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुक्यातील विजेच्या प्रश्नांबाबत गांभिर्याने चर्चा झाली असून, महायुती सरकारचे संपूर्ण सहकार्य विजेच्या प्रश्नांसाठी मिळत असल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.
सध्या माजी आमदारांकडे कोणतेही मुद्दे राहिले नसल्यामुळे केवळ स्वःताचे कार्यकर्ते आणि जनतेसमोर अस्तित्व दाखविण्यासाठी प्रश्नांची चर्चा त्यांनी सुरु केली आहे. मात्र ४५ वर्षांत हे प्रश्न त्यांना सोडविता आले नाही हे अपयश उशीरा का होईना आता ते कबूल करत आहे. पराभवाच्या छायेतून अद्यापही बाहेर येवू न शकलेल्या नेत्यांना आता केवळ पाणी प्रश्नाचे भांडवल करुन माझ्यावर टीका करावी लागते हे त्यांचे दुर्दैव आहे. पण तालुक्यातील जनता एवढी दुधखुळी नाही याचे भानही त्यांनी ठेवावे.
दरम्यान माझ्यासारख्या जनतेने पाठबळ दिलेल्या आमदाराकडे एक बोट दाखणाऱ्यांना स्वता:कडे चार बोट दाखविण्याची वेळ आली आहे. असा उपरोधिक टोला आमदार खताळ यांनी यावेळी लगावला आहे.