संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात जबरी चोरी
◻️ ५१ तोळे सोन्यासह देवीचे दोन मुकुट लंपास
◻️ आमदार अमोल खताळ यांनी दिली घटस्थळी भेट
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. देवीचे ५१ तोळे वजनाचे सोने आणि दोन चांदीचे मुकुट असा एकूण २४ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तर याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदार अमोल खताळ यांनी घटस्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणुन घेत पोलीसांना तपासासाठी सुचना दिल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिराच्या दरवाजाचे कडी - कोडां आणि कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट व चांदीच्या मुकुटांमध्ये बसविलेले ५१ तोळे वजनाचे सोन्याचे पान तसेच देवीचे सोन्याचे अन्य दागिने असा मिळून २४ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डिव्हीआर देखील चोरून नेला असल्याची प्राथमिक माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर आली आहे.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून तपासाची सुत्र वेगाने फिरवण्यात आली आहे. तर, अज्ञात चोरट्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.