चिखली ग्रामसेवक बदलीच्या सुचनेनंतर उपोषण सुटले!
◻️ पोलीसात तक्रार देऊन दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आमदार खताळ यांचे प्रशासनाला निर्देश
◻️ आमदार अमोल खताळ यांच्यासमोर ग्रामस्थानी वाचला तक्रारींचा पाढा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेविकेच्या तक्रारीचा पाढा उपोषणकर्त्यानी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर वाचला होता. त्यानंतर या ग्रामसेविकेची बदली करुन चौकशी करण्यात यावी. अशा सुचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या. यानंतर हे अमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले.
ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा न घेता ग्रामसभेचा बनाव करत खोटा ठराव करून जबाब घेत पंचनामा केला. तसेच खोटी माहिती देवून साठवण तलावाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश घेऊन प्रशासनाची दिशाभूल केली. इंदिरा आवास योजनेचे विना आदेश घरकुल पाडल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. जलजीवन साठवण तलावाऐवजी पर्यायी व्यवस्था करून ती योजना कार्यान्वित करावी. अशा विविध मागण्यांसाठी चिखली ग्रामपंचायतीसमोर भारत हासे, संजय नेहे, उमेश हासे, गणेश हासे, रमेश हासे, किसन फटांगरे, सदाशिव हासे, बाबासाहेब हासे, नंदू हासे, किशोर हासे, बाळासाहेब हासे, भास्कर हासे, अरुण हासे हे सर्व अमरण उपोषणासाठी बसले होते.
आमदार अमोल खताळ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यां समजावून घेतल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उपोषणकर्त्यानी ग्रामसेविकेच्या तक्रारीचा पाढा देखील वाचला.
संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी १० दिवसामध्ये ग्रापंचायत कारभाराची चौकशी करून तो अहवाल सादर करावा. ज्या व्यक्तीचे घरकुल पाडले आहे. त्याची रीतसर पोलीसात तक्रार द्या. पोलीसांना गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देतो व चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांना तात्काळ पदमुक्त करा आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करा असे निर्देश संगमनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी ठाकूर यांना आ. खताळ यांनी दिले.
दरम्यान यानंतर उपोषणकर्त्यानी दोन दिवसापासून सुरू असलेले आपले अमरण उपोषण सोडले आहे.