उपयोगाच्या दृष्टीकोनातून मानवाची किंमत जास्त - ह. भ. प. संदीपान महाराज
◻️ मांचीहिल येथील चैतन्य श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाची सांगता
◻️ पुरुष मल्लाप्रमाणे स्री मल्लांच्या थरारक लढतीनी फेडले कुस्तीप्रेमीच्या डोळ्यांचे पारणे
संगमनेर LIVE (आश्वी) | “माणूस कितीही सुंदर असला तरी, मोरापेक्षा सुंदर दिसणार नाही. मात्र, मोर हा ब्रम्हज्ञान प्राप्त करु शकत नाही. त्यामुळे अनेक योनीचां प्रवास करुन मिळालेला मनुष्य देह हा लाभ आहे.” उपयोगाच्या दृष्टीकोनातून माणसाची किंमत ही फार मोठी असल्याचे पटवून देताना “सोने हे पैशाने महाग असले तरी, उपयोगाच्या दृष्टीकोनातून लोखंड हे श्रेष्ठ ठरत असल्या”चे बहुमोल मार्गदर्शन ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र मांचीहिल येथे चैतन्य श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी ॲड. शाळीग्राम होडगर, संस्थानचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.
यावेळी ह. भ. प. संदीपान महाराज यांनी व्यसनाधिनतेवर ताशेरे ओढताना सांगितले की, “कितीही श्रीमंत कुटुंबात तुमचा जन्म झाला असला तरी, तुम्ही व्यसनाच्या आहरी गेल्यास तुमच्यासह तुमचे कुटुंब देखील देशोधडीला लागते यांचा विचार करा.” पाश्चात्य संस्कृतीच्या अंध अनुकरणाचा समाचार घेताना आपल्या देशात पाश्चिमात्य देशातील अंध अनुकरणामुळेचं स्वयंराचार, अत्याचार, बलात्कार, अनाचार व अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची वाढ होत असल्याचे सांगितले. त्यामुळे देश सुरक्षित करायचा असेल तर, पुढची पिढी सर्वचं स्तरावर समृध्द करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांनी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी त्यांनी विविध प्राणी व त्यांचे उपयोग यांचे देखील विविध उदाहरणाच्या माध्यमातून दाखले दिले. संस्थेचे संस्थापक ॲड. शाळीग्राम होडगर यांचे कौतुक करताना महाराज म्हणाले, “कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र व इतर राज्यात जे उपदेश करत असतो, ते येथे मांचीहिल सारख्या ठिकाणी मुर्तीमंत रुपांत पहावयास मिळाले” असल्याचे गौरवोद्गार काढले.
दरम्यान याप्रसंगी प्राचार्य विजय पिसे यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या शालेय आणि अध्यात्मिक उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थिताना सात्विक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
भाविकांची मांदियाळी..
यात्रोत्सव काळात आश्वी बुद्रुकसह पंचक्रोशीतील गावातील भाविकासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त आलेले रहाट पाळणे, खाऊ आणि मिठाईचे दुकाने, कटलरी, स्टेशनरी दुकाने त्यामुळे यात्रेला भव्य स्वरूप आले. त्याचबरोबर यात्रेनिमित्त भाविकांबरोबरचं चिमुकल्याचां आनंद देखील द्विगुणित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
पुरुष मल्लाप्रमाणे स्री मल्लांनी नोदंवला सहभाग..
यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धामध्ये पुरुष मल्लाप्रमाणे स्री मल्लांनी देखील सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या थरारक लढतीनी कुस्तीप्रेमीच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याची चर्चा दोन दिवासापासून सुरू आहे. यावेळी उपस्थित राहिलेल्या मल्लासह विजयी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते भरघोस बक्षीसे देण्यात आली.