शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीत उद्या ग्लोब फोर्ज कंपनीचे भुमिपुजन
◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांची माहिती
◻️ देशाच्या संरक्षणासाठी लागणारे अत्याधुनिक तोफखाना शेल्सचे होणार उत्पादन
संगमनेर LIVE (शिर्डी) | जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी उभारी देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनी स्थापन होत असून, प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ सोमवारी सकाळी संपन्न होत असल्याची माहीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
देशाच्या संरक्षण व्यवस्थेत मोठे योगदान देणारे जिल्ह्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या निबे स्पेस या कंपनीचा देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला ग्लोब फोर्ज लिमिटेड प्रकल्प जिल्ह्यातील पहीला प्रकल्प असून शिर्डी येथे त्याची होत असलेली पायाभरणी नव्या औद्योगिक विकासाची सुरूवात असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, उद्योग मंत्री उदय सामंत, आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजाता विकसित होत असलेल्या नव्या औद्योगिक वसाहतीच्या जागेत होणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
निबे स्पेस या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सामुग्री तयार केली जाते. शिर्डी येथील प्रकल्पातून अत्याधुनिक तोफखाना शेल्स उत्पादन होणार असून देशाच्या संरक्षण व्यवस्थेत योगदान देण्याचे कार्य करणारा प्रकल्प शिर्डीत सुरू होणे ही खूप अभिमान असल्याचे म्हणाले.