संगमेनर शहरात चौघांनी मोटार सायकल आडवून मोबाईल हिसकावला
◻️ दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर LIVE | दि. १६/०३/२०२५ रोजी फिर्यादी आकाश दशरथ आंबरे, रा. कासारवाडी (ता. संगमनेर) हे त्यांचे घरी जात असताना अनोळखी चार आरोपीनी त्यांना आडवून मारहाण करण्याची भिती दाखवून मोटार सायकल व मोबाईल जबरीने चोरून नेला. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील जबरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने पोनि दिनेश आहेर यांनी पोसई राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार अतुल लोटके, हृदय घोडके, फुरकान शेख, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सुचना दिल्या.
दिनांक २४/०३/२०२५ रोजी हे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा तांत्रीक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास करत असताना हा गुन्हा फरदीन शेख याने त्याचे साथीदारासह केला असून ते अकोले नाका येथे असलेबाबत माहिती मिळाली.
त्यामुळे या पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष अकोले नाका, संगमनेर येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव फरदीन शेख (वय - २१, अरिफ शेख (वय - २१) दोघे रा. अकोले नाका, संगमनेर तसेच दोन विधी संघर्षित बालक असे असल्याचे सांगितले.
पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता, फरदीन शेख याने सदरचा गुन्हा अरिफ शेख व एक विधीसंघर्षित बालक याचे मदतीने केला असल्याची माहिती सांगितली. तसेच गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता विधीसंघर्षित बालक याने गुन्हयातील मोबाईल त्याचे नातेवाईक सुमय्या नसीर शेख, (रा. नाईवाडपुरा, संगमनेर) यांना वापरण्यास दिला असल्याचे सांगीतले. पंचासमक्ष सुमय्या नसीर शेख यांनी मोबाईल हजर केल्याने तो तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.
या आरोपीना गुन्ह्याचे तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.