संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील जवान रामदास बढे शहीद!
◻️ जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना झाला मृत्यू
संगमनेर LIVE | जम्मू कश्मिरमध्ये भारत-पाक नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील जवान रामदास साहेबराव बडे हे शहीद झाले आहेत. ३४ एफ रेजिमेंट मध्ये ते हवालदार म्हणून कार्यरत होते. उद्या, बुधवारी मेंढवण येथे सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जम्मू-कश्मिरमधील तंगधार जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना नियंत्रण रेषेवर बढे यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त विविध प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. उद्या, बुधवारी (२६ मार्च) दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान अत्यंत गरिबीच्या परिस्थिती झगडत बडे सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या मृत्यूने मेंढवनसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान भारतीय लष्करातील जवान रामदास साहेबराव बढे हे शहीद झाल्याची दुःखद बातमी दुपारी समाज माध्यमातून नागरीकानपर्यत पोहोचल्यामुळे जड अंतःकरणाने सर्व समाज माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.