संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांकरीता ११ कोटीचा निधी - आमदार खताळ
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून निधीला मंजूरी
संगमनेर LIVE | जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून जलसंपदा तथा पालकमंत्री यांच्या सहकार्याने तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांकरीता ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम तसेच अन्य नागरीसुविधांची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने या विकास कामांसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठे सहकार्य या निधी उपलब्धतेसाठी मिळाले असल्याचे आमदार खताळ म्हणाले.
तालुक्यातील एकूण १९ महत्वपूर्ण रस्यांसाठी ३ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले असून, यामध्ये प्रामुख्याने मौजे चिखली ते केरेवाडी रस्ता २० लाख रुपये, वडगाव लांडगा ते दातीर वस्ती रु. ३० लाख, राजापूर ते खतोडे मळा रस्ता रु. ३० लाख, धांदरफळ खुर्द ते धांदरफळ बुद्रुक पुल दुरुस्ती रु. ४० लाख, नांदूरी दुमाला ते ठाकरवाडी रस्ता रु. २० लाख, निमगाव खुर्द ते चंदनवाडी रु. ३० लाख, सायखिंडी ते कारवाडी रस्त्याकरीता रुपये २० लाख, संगमनेर ते झोळे रस्त्याकरीता रु. ३० लाख, कासारे ते कानकाटे वस्तीपर्यत रु. ४० लाख, वडझरी ते कारेवाडी रु. ३० लाख, कुंभारदरा ते कर्जुले पठार करीता रु. ३० लाख, कौठे मलकापूर ते ठाकरवाडी रु. ३० लाख, नांदूर खंदरमाळ ते खैरदरा रस्त्याकरीता ३० लाख रुपये मंजूर निधी मंजूर झाला आहे.
तालुक्यातील अन्य महत्वपूर्ण रस्त्यामध्ये कासार दुमाला ते मंगळापूर शिवरस्त्याकरीता रुपये ५० लाख, वेल्हाळे ते सायखिंडी मोठेबाबा रस्ता रुपये ३० लाख, कोकणगाव ते निझर्णेश्वर देवस्थान रु. ४० लाख, रातयेवाडी ते हिवरगाव पावसा रु. ५० लाख, सुकेवाडी ते कसबेवाडी रस्ता रु. २० लाख, सावरचोळ ते शिसरगाव धूपे जवळे बाळेश्वर रस्त्याकरीता ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी व नागरीकांना शहरामध्ये येण्यासाठी दळणवळण अधिक सोयीचे होईल असा विश्वास आ. खताळ यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या खोल्यांसाठी सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये प्रामुख्याने बिरेवाडी येथे २, पिंपळगाव कोंझीरा १, निळवंडे १, डोळासणे १, हिवरगाव पावसा १, तळेगाव येथील धनगरवाडी शाळेसाठी १, पोखरी हवेली १ आणि मांडवे बुद्रुक येथील शाळेकरीता १ खोलीच्या कामासाठी हा निधी मंजूर झाला असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर होईल.
आमदारांच्या स्थानिक विकास निधी सुमारे २ कोटी ८६ लाख रुपये निधी महायुती सरकारने मंजूर केला असून, या निधीतून सभागृह तसेच गावांच्या सुशोभिकरणासाठी, सभामंडप, परिसर सुशोभिकरण, मंदीर दुरुस्ती, दशक्रिया विधी घाट इ. सार्वजनिक कामे या निधीतून होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया वेगाने सुरु झाली असून, शहरांबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासालाही निधी उपलब्ध करुन देण्याचे काम सरकारच्या माध्य मातून होत आहे. पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे भक्कम पाठबळ तालुक्याचे विकासासाठी मिळत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भविष्यातही अधिकचा निधी तालुक्याच्या पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.