आश्‍वी अप्पर तहसिल कार्यालय विरोधाचा जोर्वेच्या ग्रामसभेत निषेध!

संगमनेर Live
0
आश्‍वी अप्पर तहसिल कार्यालय विरोधाचा जोर्वेच्या ग्रामसभेत निषेध!

◻️ माजी मंत्री थोरात यांच्या समर्थकांचा ठराव ग्रामस्थांनी धुडकावला

◻️ आश्‍वी ऐवजी जोर्वे येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय करण्याची केली मागणी 

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जोर्वे  ग्रामपंचायतीने दि. ३ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ही ग्रामसभा आश्‍वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात होती. या विषयावरून ग्रामसभेत चांगलाच कलगीतुरा बघावयास मिळाला अखेर ही ग्रामसभा नेहमीप्रमाणे वादळीच ठरली. थोरात गटाने अप्पर तहसील कार्यालयास विरोध म्हणून ठराव मांडला. त्यास बहुतांश ग्रामस्थांनी विरोध करून अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध करून आश्‍वी येथे प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय जोर्वे मध्ये करण्याची मागणी केली.

अप्पर तहसील कार्यालयास आमचा जाहीर पाठिंबा आहे. असा मुद्दा उपस्थित केल्याने माजी मंत्री थोरात यांना स्वतःच्याच गावातून घरचा आहेर मिळाल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत चर्चेला घेतलेल्या जोर्वे गावाचा समावेश हा आश्‍वी येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयात करायचा की नाही? हा मूळ विषय असताना जोर्वे ग्रामस्थांनी तर अप्पर तहसील कार्यालय आश्‍वी येथे न करता मध्यवर्ती ठिकाण म्हणून जोर्वेतच करावे अशी मागणी केली.

संगमनेर तालुक्यात एकूण १७४ गावे आहेत. या तुलनेत तहसील कार्यालय मात्र एकच आहे. यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. यामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण न होता रखडत आहेत आशी भूमिका मांडण्यात आली.

नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी नक्कीच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे. संगमनेर शहरालगतची महसूल मंडळातील काही गावे वगळून मग अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा निर्णय घ्यावा असे मत सुज्ञ ग्रामस्थांनी मांडले. यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय होणेबाबत मोठ्या आवाजात ठराव मांडण्यात आला.

मतदारसंघाची फेररचना करताना जोर्वे गावाचा समावेश हा शिर्डी मतदार संघात करण्यात आला. त्यावेळी तालुक्याच्या माजी आमदारांनी का विरोध दर्शविला नाही. त्यावेळी तालुका विभागला जात नव्हता का? आजच का तुम्हाला जोर्वे गाव व तालुक्याचा पुळका आला आहे. कनोली, मनोली, कनकापुर, दाढ चनेगाव, शिबलापूर या गावांचा माजी आमदारांना पोटशूळ का असा सवाल उपस्थित करुन गोकुळ दिघे म्हणाले की, सर्वसामान्यांची महसुलशी निगडित असलेली शेती शिवार रस्ते, शेती वादातील सुनावण्या, शिधापत्रिका, निराधार योजना अशी विविध कामे वेळेत व गतीने पूर्ण होणार आहेत. हे तुम्हाला बघवत नाही का? 

तसेच संगमनेर शहरालगतची महसूल मंडळातील काही गावे वगळून प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय हे होणे आवश्यकच आहे. यामुळे आश्‍वी, उंबरी बाळापूर, पानोडी, ओझर, झरेकठी, शेडगाव, शिबलापूर, कनकापूर, चिंचपुर या गावांना न्याय मिळेल. तर शक्य असल्यास प्रशासनाने अप्पर तहसील कार्यालयासाठी जोर्वेचाच विचार करावा अशी मागणी आम्ही सर्व ग्रामस्थ पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे करणार असून नव्याने निर्माण होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया गोकुळ दिघे यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !